गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएलएल) सातव्या मोसमात नॉर्थईस्ट युनायटेडने बाद फेरीतील प्रवेशावर धडाक्यात शिक्कामोर्तब केले. केरला ब्लास्टर्सला 2-0 असे हरवून निर्णायक विजयासह नॉर्थईस्ट युनायटेडने ही कामगिरी साकारली. गुणतक्त्यात तिसरा क्रमांक गाठत नॉर्थईस्ट युनायटेडने हा टप्पा गाठला.
स्पेनच्या जेरार्ड न्यूस यांना मोसमाच्या मध्ये निरोप दिल्यानंतर नॉर्थईस्ट युनायटेड क्लबच्या व्यवस्थापनाने भारताच्या खलीद जमिल यांच्याकडे सुत्रे सोपविली. त्यांनी क्लबचा तसेच चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरविला. आजच्या निर्णायक लढतीत दोन्ही गोल भारतीय खेळाडूंनी केले.
वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. मध्यंतरास नॉर्थईस्ट युनायटेडकडे 2-0 अशी उपयुक्त आघाडी होती. अखेरपर्यंत त्यांनी ही आघाडी अबाधित राखली. आघाडी फळीतील केरळच्या 28 वर्षीय सुहैर वडाक्केपीडीका याने 34व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत मध्य फळीतील मिझोरामच्या 20 वर्षीय लालेंगमाविया याने ब्लास्टर्सचा दुसरा गोल केला.
नॉर्थईस्ट युनायटेडने 20 सामन्यांत आठवा विजय मिळविला असून नऊ बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 33 गुण झाले. त्यांनी एफसी गोवा संघाला मागे टाकून तिसरा क्रमांक गाठला. गोव्याचा अखेरचा सामना बाकी आहे. 19 सामन्यांत 30 गुण अशी गोव्याची कामगिरी आहे. एटीके मोहन बागान (19 सामन्यांतून 40) आणि मुंबई सिटी एफसी (19 सामन्यांतून 37) या दोन संघांचा बाद फेरीतील प्रवेश यापूर्वीच नक्की झाला आहे.
रविवारी साखळीतील अखेरच्या दिवशी दोन महत्त्वाच्या लढती होतील. एफसी गोवा आणि हैदराबाद यांच्यातील विजयी संघासह बाद फेरीतील चौथा संघ नक्की होईल. त्यानंतर मुंबई आणि एटीके मोहन बागान यांच्यात साखळीतील अव्वल क्रमांकाचा मुकाबला रंगेल.
ब्लास्टर्सला 20 सामन्यांत नववा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व आठ बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 17 गुण व गुणतक्त्यात 11 संघांमध्ये शेवटून दुसरे म्हणजे दहावे स्थान कायम राहिले.
सामन्याच्या 34व्या मिनिटाला मध्यरक्षक खासा कमारा याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. त्याने मारलेला चेंडू अडविण्याचा प्रयत्न ब्लास्टर्सचा बचावपटू बकारी कोने याने केला, पण किक चुकली. त्यामुळे सुहैरला संधी मिळाली. पेनल्टी क्षेत्रालगत डावीकडे चेंडू मिळताच प्रतिस्पर्धी बचावपटू संदीप सिंग याचा चकवून सुहैरने पेनल्टी क्षेत्रात प्रवेश केला. त्यावेळी त्याला रोखण्यासाठी ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स पुढे सरसावला, पण सुहैरने त्याला चकवित फिनिशींग केले.
पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत नॉर्थईस्ट युनायटेडने दुसरा गोल केला. आघाडी फळीतील लुईस मॅचादो याने उजवीकडून क्रॉसशॉट मारताना अकारण जास्त ताकद लावली होती, पण बचावपटू डायलन फॉक्स याने पेनल्टी क्षेत्रात डावीकडे चेंडूवर व्यवस्थित ताबा मिळविला आणि लालेंगमाविया याला पास दिला. लालेंगमावियाने दमदार फटका मारला. त्यावेळी चेंडू गोम्सच्या उजव्या हाताच्या बाजूने क्रॉसबारच्या खाली लागून नेटमध्ये गेला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल २०२०-२१: बेंगळुरूला हरवून जमशेदपूरची विजयी सांगता
आयएसएल २०२०-२१ : बिपीनच्या हॅट््ट्रीकमुळे मुंबई सिटीकडून ओदीशाचा धुव्वा
आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालला हरवित नॉर्थईस्ट चौथ्या स्थानी