---Advertisement---

आयएसएल २०२०-२१ : नॉर्थईस्ट युनायटेडची बेंगळुरूविरुद्ध लढत

On: सोमवार, जानेवारी 11, 2021 9:10 PM
---Advertisement---

गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) मंगळवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि बेंगळुरू एफसी यांच्यात वास्को येथील टिळक मैदानावर सामना होईल. भक्कम सुरुवातीनंतर दोन्ही संघांचा फॉर्म खालावला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना बाद फेरीच्या दृष्टिने विजयाची प्रतिक्षा असेल.

बेंगळुरू सहाव्या क्रमांकावर असून त्यांचे 12 गुण आहेत. नॉर्थईस्ट त्यांच्यापेक्षा एका गुणाने मागे आहे. दोन्ही संघांचे केलेले गोल हे त्यांच्याविरुद्ध झालेल्या गोलपेक्षा कमी आहेत. बेंगळुरूला सलग चार सामने गमवावे लागले आहेत, तर नॉर्थईस्टला गेल्या सहा सामन्यांत विजय मिळाला नसून त्यांना तीन पराभव पत्करावे लागले आहेत.

उभय संघांमधील याआधीच्या लढतीत नॉर्थईस्टने दोन गोलच्या पिछाडीवरून झुंज देत 2-2 अशी बरोबरी साधली होती. नॉर्थईस्टचे सहाय्यक प्रशिक्षक अॅलिसन खार्सीन्तीएव यांना संघ उसळी घेऊन नव्याने प्रारंभ करण्याची आशा वाटते. जेरार्ड न्यूस निलंबीत असल्यामुळे अॅलिसन यांच्याकडे संघाची सुत्रे असतील.

ते म्हणाले की, आम्हाला नकारात्मकच नव्हे तर सकारात्मक बाजूंवरही लक्ष केंद्रीत करावे लागेल. मोसमाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना आम्ही उद्या खेळणार आहोत. हा दिवस नवा असेल. आमच्यासाठी नवी सुरुवात असेल. खेळाडू आणि एकूणच संघ चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करेल अशी मला खात्री आहे.

बेंगळुरूचे हंगामी प्रशिक्षक नौशाद मुसा यांनी कार्लेस कुआद्रात यांच्याकडून सुत्रे स्विकारली आहेत. एससी ईस्ट बंगालविरुद्ध त्यांचा पहिला सामना होता. त्यात त्यांना संघाची पिछेहाट रोखता आली नाही. त्यांचा संघ 0-1 असा हरला. यातील एक सकारात्मक बाब म्हणजे मुसा यांनी आपल्या कल्पना खेळाडूंपर्यंत पोचविल्या आहेत.

मुसा यांनी सांगितले की, ईस्ट बंगालविरुद्धच्या सामन्यापूर्वी मी हाच संदेश दिला की निकालाची चिंता करू नये. काहीही घडले तरी आपण मैदानावर शंभर टक्के प्रयत्न केले अशा भावनेने आम्ही परतलो. विजय स्वाभाविकच महत्त्वाचा आहे, पण मागील सामन्यात सर्वांत महत्त्वाची बाब अशी होती की आम्हाला कशा पद्धतीने खेळायचे आहे याबाबत खेळाडूंचा माझ्या दृष्टिकोनावर विश्वास बसायला हवा होता. ते साध्य करण्यात मी यशस्वी ठरलो असे वाटते. याचा पुढील सामन्यात आम्हाला फायदा होईल.

नॉर्थईस्टविरुद्धच्या लढतीनंतर संघाला कामगिरीचा आणखी चांगला अंदाज येईल असे मुसा यांना वाटते. त्यांनी सांगितले की, मी नॉर्थईस्टच्या खेळाचे निरीक्षण करतो आहे. त्यांचा संघ वाईट नाही. याआधी आम्ही त्यांच्याविरुद्ध खेळलो तेव्हा 2-2 अशी बरोबरी झाली. त्यांचा संघ झुंजार खेळ करणारा आहे. त्यामुळे आम्हाला गाफील राहून चालणार नाही. आमच्या खेळाडूंना त्यांच्या भूमिकेची आणि जबाबदारीची जाणीव आहे. स्पर्धेत आपले स्थान कुठे आहे हे समजण्यासाठी या लढतीला किती महत्त्व आहे याचीही त्यांना कल्पना आहे. आमच्या हातात दहा सामने आहेत आणि उर्वरीत स्पर्धेत चांगली सुरवात होण्यासाठी आम्ही नॉर्थईस्टविरुद्ध विजयाने सुरवात करायला हवी.

संबधित बातम्या:

आयएसएल २०२० : ब्लास्टर्सला धक्का देत ओदिशाचा पहिला विजय

आयएसएल २०२०-२१ : थरारक लढतीत ईस्ट बंगाल-गोवा यांची बरोबरी

आयएसएल २०२० : बेंगळुरूला गारद करीत मुंबई सिटीची आघाडीवर मुसंडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---