इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया आता पूर्णपणे सज्ज आहे. मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून हेडिंग्ले येथे खेळला जाईल. नवीन कर्णधार शुबमन गिलसाठीही (shubman gill) मोठी परीक्षा आहे. अशाप्रकारे, गिल मैदानावर जाण्यापूर्वी संपूर्ण खेळाचे नियोजन करत आहे. इंग्लंडच्या जमिनीवरती केएल राहुल (KL Rahul) किंवा रिषभ पंत (Rishabh pant) नाही तर दुसराच दिग्गज खेळाडू कर्णधार गिलचे मुख्य शस्त्र असणार आहे. इंग्लंडमधील या खेळाडूचा रेकॉर्डही आतापर्यंत खूप चांगला आहे.
भारतीय फलंदाजांना इंग्लंडच्या भूमीवर धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. रोहित शर्मा(Rohit Sharma), चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) आणि विराट कोहली(Virat Kohli) यांच्या अनुपस्थितीत या तरुण फलंदाजांसाठी ही मालिका म्हणजे आणखीनच मोठा धोका आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या दौऱ्यावर सर्वांचे लक्ष अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजावर (Ravindra Jadeja) असेल. जो बराच काळ संघाचा भाग आहे. रवींद्र जडेजाने इंग्लंडच्या भूमीवर फलंदाजीने 29.4 च्या सरासरीने 642 धावा केल्या आहेत. सध्या, इंग्लंडच्या जमिनीवरती जडेजापेक्षा जास्त कसोटी धावा इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेल्या नाहीत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या केएल राहुलने 34.1 च्या सरासरीने 614 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत, कर्णधार गिल फलंदाजी करताना जडेजावर अवलंबून असणार आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूबद्दल बोललो तर तो यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आहे. त्याने 32.7 च्या सरासरीने 556 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या शार्दुल ठाकूरने 24.7 च्या सरासरीने 173 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने इंग्लंडमध्ये 88 कसोटी धावा केल्या आहेत, तर जसप्रीत बुमराहने 131 कसोटी धावा केल्या आहेत. गेल्या काही वर्षांत, रवींद्र जडेजा परदेशी भूमीवर टीम इंडियासाठी सर्वोत्तम फलंदाज म्हणून समोर येत आहे. जर त्याने इंग्लंडच्या जमिनीवरती आपले कारनामे सुरू ठेवले तर पुढील 1 वर्षासाठी त्याचे संघातील स्थान निश्चित होईल.