फ्रेंच ओपन २०२१ स्पर्धेत शुक्रवारी(११ जून) पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीतील सामने पार पडले. या फेरीतील दुसरा सामना सार्बियाच्या नोवाक जोकोविच विरुद्ध स्पेनच्या राफेल नदाल यांच्यात झाला. या सामन्यात अव्वल मानांकित जोकोविचने १३ वेळच्या फ्रेंच ओपन विजेत्या राफेल नदालचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
‘लाल मातीचा बादशाहा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदालचा हा फ्रेंच ओपन स्पर्धेतील केवळ तिसरा पराभव आहे. त्याने या स्पर्धेत १०८ सामने खेळले असून १०५ सामने जिंकले आहेत. तसेच नदालला फ्रेच ओपनच्या उपांत्य फेरीत पराभूत करणारा जोकोविच हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
शुक्रवारी पार पडलेल्या उपांत्य सामन्यात जोकोविच आणि दुसऱ्या मानांकित नदालमध्ये ४ तास २२ मिनिटांची लढत झाली. या लढतीत जोकोविचने ३-६, ६-३, ७-६ (४), ६-२ अशा फरकाने चार सेटमध्ये नदालचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना गाठला. मागीलवर्षी या दोघांमध्ये फ्रेंच ओपनचा अंतिम सामना पार पडला होता. त्यात नदालने बाजी मारत १३ व्यांदा फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरले होते.
जोकोविचला आहे मोठी संधी
राफेल नदालला फ्रेंच ओपनमध्ये पराभूत करणे सोप्पी गोष्ट नाही. आजपर्यंत १०८ सामन्यांत फ्रेंच ओपनमध्ये नदालने जे ३ पराभव पाहिले आहेत, त्यातील २ पराभव एकट्या जोकोविचने केले आहेत. तर तिसरा पराभव ३१ मे २००९ रोजी रॉबीन सोडरलिंगने केला होता. त्याचवर्षी फेडररने फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकत करियर ग्रँडस्लॅम पुर्ण केले होते. करियर ग्रँडस्लॅम म्हणजे कारकिर्दीच्या कोणत्याही टप्प्यावर चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा एकदातरी जिंकणे होय. २०१५ मध्ये जोकोविचने पहिल्यांदाच नदालचा फ्रेंच ओपनमध्ये पराभव केला होता. परंतू जोकोविचला अंतिम सामन्यात स्टॅन वावरिंकाकडून पराभव स्विकारावा लागला होता. २०१६मध्ये नदालने तिसऱ्या फेरीत दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्याच स्पर्धेत अंतिम फेरीत अँडी मरेचा पराभव करत जोकोविचने पहिल्यांदा फ्रेंच ओपन जिंकत करियर ग्रँडस्लॅम पुर्ण केले होते. आता जोकोविचला मोठी संधी मिळाली आहे. ही स्पर्धा जिंकली तर त्याच्या नावे अनेक विक्रम होणार आहे.
जोकोविचला हे पराक्रम करण्याची आहे संधी-
– जर जोकोविच ही स्पर्धा जिंकला तर त्याला सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्वित्झर्लँडच्या रॉजर फेडवर व स्पेनच्या राफेल नदालच्या आणखी जवळ जाण्याची संधी मिळणार आहे. फेडररने व नदालने प्रत्येकी २० वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. जोकोविचने ९ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, १ वेळा फ्रेंच ओपन, ५ वेळा विंब्लडन व ३ वेळा युएस ओपन अशा एकूण १८ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे जर त्याने फ्रेच ओपन २०२१ चे विजेतेपद जिंकले तर हे त्याचे १९ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद असेल.
-जर जोकोविचने यावेळी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली तर दोन वेळा करियर ग्रॅंडस्लॅम जिंकणारा टेनीस इतिहासातील तो केवळ तिसरा खेळाडू ठरणार आहे. महान टेनीसपटू रोड लेवर यांनी १९६२ व १९६९ साली एकाच वर्षात ४ पैकी ४ ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यांनी कॅलेंडर ग्रॅंडस्लॅम दोनदा जिंकण्याचा कारनामा केला आहे. असा पराक्रम आजपर्यंत पुरुष टेनीसपटूंमध्ये ते सोडून कुणालाही जमला नाही. तर रॉय एमर्सन यांनी १९६७ साली फ्रेंच ओपन जिंकत दुसऱ्यांदा करियर ग्रॅंडस्लॅम जिंकण्याचा कारनामा केला होता.
-रॉजर फेडरर २०१८ साली ऑस्ट्रेलियन ओपनच्या रुपाने आपले शेवटचे ग्रँडस्लॅम जिंकला असून तेव्हापासून आजपर्यंत नदाल ४ तर जोकोविच ६ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. जोकोविचला त्यानंतरचे सातवे ग्रँडस्लॅम जिंकत आपला दबदबा कायम राखण्याची मोठी संधी आहे.
-राफेल नदालला फ्रेंच ओपन स्पर्धेच्या कोणत्याही टप्प्यावर पराभूत करत विजेतेपद जिंकण्याची किमया आजपर्यंत कोणालाही साधता आली नाही. २००५ साली नदाल पहिल्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धेत सहभागी झाला व त्याच वर्षी तो ही स्पर्धा जिंकला होता. त्यानंतर २००९ साली सोडर्लिंगने त्याला पराभूत केले परंतू सोडर्लिंगला तेव्हा फ्रेंच ओपन जिंकता आली नव्हती. २०१५ साली जोकोविचने नदालला पराभूत केले परंतू स्पर्धेचा विजेता वावरिंका ठरला होता. २०१६साली नदालने चालू स्पर्धेतून माघार घेतली होती. यामुळे जर जोकोविच यावर्षी फ्रेंच ओपन जिंकला तर नदालला पराभूत करत फ्रेंच ओपन जिंकणारा पहिला खेळाडू होण्याचा मान त्याला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
फ्रेंच ओपन: जोकोविचने मोडले ‘लाल मातीच्या बादशहा’चे आव्हान; २९ वी ग्रँडस्लॅम फायनल खेळण्यास सज्ज
फ्रेंच ओपन: ग्रीसच्या त्सित्सिपासने घडवला इतिहास; पहिल्यांदा ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये केला प्रवेश