रविवारी(13 जून) फ्रेंच ओपन 2021 स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात सार्बियाच्या नोव्हाक जोकोविचने विजय मिळवत कारकिर्दीतील 19 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले. तसेच हे त्याचे फ्रेंच ओपनमधील दुसरे विजेतेपद ठरले. त्याने रविवारी अंतिम सामन्या ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपासला पराभूत केले. या सामन्यानंतर विजेत्या जोकोविचने आपल्या युवा चाहत्याला मोठी भेट दिली. भेट मिळाल्यानंतर त्या चाहत्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. त्याच्या आनंदाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
पहिल्या दोन सेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोविचचा पराभव झाला. पहिल्यांदा ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पोहोचलेल्या त्सित्सिपासने विजयी होण्याची आशा निर्माण केली. पण जोकोविचने शेवटचे तीन सेट जिंकून कारकीर्दीतील दुसरे फ्रेंच ओपन जिंकले. त्याने हा सामना 6-7 (6), 2-6, 6-3, 6-2, 6-4 असा जिंकला.
या सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकही हा उत्कृष्ट सामना पाहून खूप आनंदी झाले होते. हा सामना संपल्यानंतर विजेत्या जोकोविचने एका चिमुकल्या चाहत्याला एक भेट दिली, ज्याची त्याला आजिवन आठवण होईल. जोकोविचने त्याचे रॅकेट त्या युवा चाहत्याला भेट म्हणून दिले. रॅकेट मिळाल्यानंतर चाहत्याचा आनंद गगनात मावत नव्हता. तो जोरजोराने हसू लागला, उड्या मारु लागला. त्या मुलाची प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
https://twitter.com/darrenrovell/status/1404134249503076358?s=20
सामन्यानंतर जोकोविच म्हणाला की, “मला संपूर्ण सामन्यात त्या चाहत्याचा आवाज ऐकू येत होता. विशेषत: जेव्हा मी पहिले दोन सेट गमावले. तो मला सतत प्रोत्साहन देत होता. तो मला रणनीती देखील सांगत होता. तो म्हणत होता, तुमची सर्व्हिस वाचवा, आरामात सुरूवात करा, मग त्सित्सिपासला दबावात टाका. त्याच्या हातामागे शॉट खेळा. तो मला खरोखर प्रशिक्षण देत होता.”
तो पुढे म्हणाला, “मला ते खूप आवडत होतं, खूप छान वाटत होते. म्हणून मी विचार केला की, सामन्यानंतर मी माझे रॅकेट एका चांगल्या व्यक्तीकडे द्यावे. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
जोकोविचने दुसऱ्यांदा जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपद; ‘हे’ विक्रमही केले नावावर
फ्रेंच ओपन २०२१: बार्बरा क्रेचीकोवाने लाल मातीवर रचला इतिहास, पटकावले पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद