जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणारा सार्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारने शुक्रवारी (१४ जानेवारी) दुसऱ्यांदा रद्द केला आहे. त्यामुळे जोकोविचच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १७ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ ची मुख्य स्पर्धा सुरु होणार आहे.
सध्या जगभरात कोरोनाचा प्रार्दुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे विविध देशांमध्ये वेगवेगळे नियमही करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियात देखील अनेकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. दरम्यान, जोकोविचने कोरोनो लस घेतलेली नसल्याने त्याच्या ऑस्ट्रेलियातील प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. तो सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून त्याचा दुसऱ्यांदा व्हिसा रद्द करण्यात आल्याने आता त्याला हा देश सोडून जावे लागण्याची शक्यता आहे.
यापूर्वी ६ जानेवारीला तो मेलबर्न आल्यानंतरही त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. पण त्यानंतर त्याने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी त्याला मेलबर्न न्यायालयाने ऑस्ट्रेलियन सरकारद्वारे जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हणत त्याला दिलासा दिला होता.
पण आता पुन्हा एकदा त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. त्याचा हा व्हिसा ऑस्ट्रेलियाचे इमिग्रेशन मंत्री ऍलेक्स हॉक यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत जोकोविचचा व्हिसा रद्द केला आहे. आरोग्य आणि सुव्यवस्था ही कारणे देत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
अधिक वाचा – प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला मोठा दिलासा, ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील केस जिंकली
कोरोना लसीसाठी सूट मिळविण्यासाठी योग्य पुरावे प्रदान करण्यात अयशस्वी ठरल्याने त्याता व्हिसा पहिल्यांदा रद्द करण्यात आला होता. त्यावेळी त्याला मेलबर्न विमानतळावरच काहीवेळ थांबावे लागले होते. तसेच त्याला एका डिटेंशन हॉटेलमध्ये ४ दिवस राहावे लागले होते. १० जानेवारी रोजी त्याला न्यायालयाने व्हिसा देत हॉटेलबाहेर येण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या तयारीला सुरुवात केली होती. पण, पुन्हा एकदा त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. आता यावर जोकोविच काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागणार आहे. तसेच तो पुन्हा न्यायालयात धाव घेतो का हे देखील पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी मोठा वाद! अव्वल मानांकित जोकोविचला विमानतळावरच रोखले
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत 18 व्या मानांकित कारास्तेवसह अव्वल 100 खेळाडूमधील आठ खेळाडूंचे आकर्षण
व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?