गेल्या काही वर्षांमधे टेनिसचे “बिग फोर” म्हणून ओळखले जाणारे राफेल नदाल, राॅजर फेडरर, नोव्हाक जोकोविच आणि अँन्डी मरे यांनी ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धांवर नक्कीच वर्चस्व गाजवले आहे.
काल फ्रेंच ओपन स्पर्धेच्या ऊपांत्यपूर्व सामन्यात बिगर मानंकित मार्को सेचिनाटो या खेळाडूने जोकोविचचा केलेला पराभव म्हणजे, टेनिसच्या “बिग फोर” जनरेशनचा अंत आहे असे सुचक वक्तव्य जर्मनीचे महान टेनिसपटू बोरीस बेकर यांनी केले आहे.
बोरीस बेकर पुढे म्हणाले की, टेनिस आता नव्या युगात प्रवेश करत आहे. डोमनिक थेईम आणि अॅलेक्सेंडर झेरेव यांच्यासारख्या नव्या दमाच्या खेळाडूंनी आपल्या खेळाची जादू दाखवायला सुरूवात केली आहे.
बोरीस बेकर पुढे बोलताना असेही म्हणाले की, ” क्रीडा माध्यमांनी आता हे स्वीकारले पाहिजे की, टेनिसमधील “बीग फोर” आत्ता संपले आहेत. डोमनिक थेईम आणि लेक्सेंडर झेरेवने गेल्या काही काळात क्रमवारीत सातत्याने टाॅप टेनमधे स्थान मिऴवले आहे. आता क्रीडा माध्यमांनी या तरूण टेनिसपटूंसाठी नवीन ऊपाधी शोधावी.”
फ्रेंच ओपन स्पर्धा विक्रमी 11 व्या वेऴेस जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या राफेल नदालच्या समोर डोमनिक थेईमचे कडवे आव्हान असणार आहे.
बेकर पुढे म्हणाले की, “राफेल नदालचे क्ले कोर्टवरचे विक्रम सहजासहजी मोडणे शक्य नाही. नदालने क्ले कोर्टवर केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे.”