---Advertisement---

जोकोविचने दुसऱ्यांदा जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपद; ‘हे’ विक्रमही केले नावावर

---Advertisement---

पॅरिस। रविवारी(१३ जून) फ्रेंच ओपन २०२१ स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात सार्बियाच्या नोव्हाक जोकोविचने विजय मिळवत कारकिर्दीतील १९ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले. तसेच हे त्याचे फ्रेंच ओपनमधील दुसरे विजेतेपद ठरले. त्याने रविवारी अंतिम सामन्या ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपासला पराभूत केले. या विजेतेपदासह जोकोविचने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली.

तब्बल ४ तास ११ मिनिटे चाललेल्या या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित जोकोविचने २२ वर्षीय त्सित्सिपासला ६-७(६), २-६, ६-३, ६-२, ६-४ अशा फरकाने ५ सेटमध्ये पराभूत केले. याबरोबरच जोकोविचने कारकिर्दीत दुसऱ्यांदा करियर ग्रँडस्लॅम पूर्ण केले आहे. करियर ग्रँडस्लॅम म्हणजे कारकिर्दीच्या कोणत्याही टप्प्यावर चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा एकदातरी जिंकणे होय.

दोनवेळी करियर ग्रँडस्लॅम जिंकणारा जोकोविच टेनिस इतिहासातील तिसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी रॉय इमर्सन आणि रोड लेवर यांनी असा कारनामा केला होता. रोड लेवर यांनी १९६२ व १९६९ साली एकाच वर्षात ४ पैकी ४ ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकल्या होत्या. जोकोविच याने २०१६ रोजी पहिल्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकत करियर ग्रँडस्लॅम पूर्ण केले होते.

नदाल फेडररच्या जवळ पोहचला जोकोविच
जोकोविचन १९ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकून सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्वित्झर्लँडच्या रॉजर फेडवर व स्पेनच्या राफेल नदालच्या आणखी जवळ गेला आहे. फेडररने व नदालने प्रत्येकी २० वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. जोकोविचने ९ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, २ वेळा फ्रेंच ओपन, ५ वेळा विंब्लडन व ३ वेळा युएस ओपन अशा एकूण १९ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

दोन सेट गमावल्यानंतर जोकोविचचे पुनरागमन 
या सामन्यात ५ व्या मानांकित त्सित्सिपासने पहिले २ सेट जिंकून आघाडी मिळवली होती.  पहिल्या सेटमध्ये ५-४ अशी आघाडी असताना त्सित्सिपासला सेट जिंकण्याची संधी होती. पण जोकोविचने सेट पाँइंट वाचवला, तसेच त्सित्सिपासची सर्विस ब्रेक करत ६-५ अशी आघाडीही घेतली. मात्र त्सित्सिपासनेही चांगला खेळ करत ६-६ अशी बरोबरी करत पहिला सेट टायब्रेकरपर्यंत नेला. चूरशीच्या टायब्रेकरमध्ये ८-६ असा विजय मिळवत त्सित्सिपासने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये त्सित्सिपासने पूर्णपणे वर्चस्व ठेवले होते. त्याने पहिल्या २ गेम जिंकत आघाडी मिळवली होती. त्याने या सेटमध्ये मिळवलेली लय कायम ठेवत हा सेट ६-२ अशा फरकाने जिंकला.

यानंतर मात्र, जोकोविचने आपला खेळ उंचावत नेला. त्याने आपला अनुभव पणाला लावत ३-१ अशी आघाडी मिळवली. त्सित्सिपासला नंतर आणखी २ गेम जिंकला आल्या. पण जोकोविचने हा सेट ६-३ असा आपल्या नावावर केला. चौथ्या सेटमध्ये जोकोविचने त्सित्सिपासला कोणतीही संधी दिली नाही. त्याने या सेटमधील पहिल्या दोन्ही सर्विस मोडून काढत ४-० अशी आघाडी मिळवली होती. त्याने हा सेट ३९ मिनिटात ६-२ अशा फरकाने जिंकला. अखेरच्या सेटमध्ये त्सित्सिपासने आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र अव्वल क्रमांकावर असलेल्या जोकोविचने हा सेटही जिंकून विजेतेपदाला गवसणी घातली.

पहिले दोन सेट गमावल्यानंतर ग्रँडस्लॅमचा अंतिम सामना जिंकणारा जोकोविच सहावा खेळाडू आहे. यापूर्वी डॉमनिक थिम (२०२० अमेरिकन ओपन), गस्टर गॉडिओ (२००४ फ्रेंच ओपन), आंद्रे आगासी (१९९९ फ्रेंच ओपन), इव्हान लेंडल (१९८४ फ्रेंच ओपन) आणि बॉर्ग (१९७४ फ्रेंच ओपन) यांनी असा कारनामा केला होता.

रविवारी अंतिम सामन्यात पराभूत होणारा त्सित्सिपास हा पहिलाच ग्रीक टेनिसपटू आहे, ज्याने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. हा त्याचा कारकिर्दीतील पहिलाच ग्रँडस्लॅम अंतिम सामना होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

फ्रेंच ओपन २०२१: बार्बरा क्रेचीकोवाने लाल मातीवर रचला इतिहास, पटकावले पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद

जर जोकोविच फ्रेंच ओपन जिंकला तर कोण-कोणते विक्रम करु शकतो आपल्या नावावर?

फ्रेंच ओपन: ग्रीसच्या त्सित्सिपासने घडवला इतिहास; पहिल्यांदा ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये केला प्रवेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---