नाशिक : नाशिक सायकलीस्टचा उपक्रम असलेली नाशिक रंडोनर्स मायलर्स अर्थात एनआरएमच्या तिसऱ्या पर्वातील दुसरी राईड रविवारी (दि. 10) उत्साहात झाली. 20, 40 आणि 120 किमी या प्रकारात राईड्स झाल्या.
नाशिकचे प्रथम आयर्न मॅन अमर मियाजी आणि नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी झेंडा दाखवून राईडसुरुवात झाली. 20 किमीची राईड 14 वर्षाखालील मुलामुलींसाठी होती. शिवशक्ती सायकल्स (गंगापूर नाका) पासून ते हॉटेल गम्मत जम्मत व तेथून यु टर्न घेऊन पुन्हा गंगापूर नाका असा या राईडचा मार्ग होता. टेडी डे राईड असे नाव देण्यात आलेल्या या राईडचा मुलांनी आपल्या पालकांसोबत सुरक्षितपणे आनंद घेतला. अम्मर मियाजी यांचा मुलगा झईन (वय 7) याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 20 किमी अंतर यशस्वीपणे पूर्ण केले. परम जीत भेला आणि डॉ. स्नेहल देव यांच्या देखरेखीखाली ही राईड पूर्ण झाली.
40 आणि 120 किमी अंतराची राईड ही 14 वर्षांपेक्षा जास्त वयोगटासाठी होती. शिवशक्ती सायकल्स (जुना गंगापूर नाका) पासून पेठ रोड, दिंडोरी रोड, म्हसरूळ, वरवंडी, आंबेगाव, जानोरी, दहावा मैल असा अतिशय सुंदर आणि ग्रामीण भागातून जाणारा होता. भटक्या कुत्रांचा सुळसुळाट असूनदेखील सायकलस्वारांनी प्रसन्न वातावरणाची मजा लुटली. साहेबराव कासव आणि सचिन गलांडे यांनी विशेष प्राविण्य मिळविले.
120 किमी साठी पुढे सैय्यद पिंप्री, लाखलगाव, निफाड, नैताळे, बोकडदरे ते पुन्हा नाशिकला यावयाचे होते. सकाळची थंडी आणि दुपारचे ऊन असे अंगावर झेलत मनोज आणि राकेश या जोडीने आपला ठसा उमटविला.
ही राईड यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी परमजीत व दविंदर भेला, चंद्रकांत नाईक, मोहन देसाई आणि सुरेश डोंगरे यांच्या एनआरएम 3 टीम आणि नाशिक सायकलीस्टच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. त्यांना शिशिर आचार्य, सतीश महाजन, यश देसाई यांनी मोलाचे सहकार्य केले. पुढची एनआरएम 3.3 राईड 10 मार्च रोजी आयोजित केली जाणार आहे.