विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज(6 ऑक्टोबर) शेवटच्या दिवशी आर अश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या थेनुस डी ब्रूनची विकेट घेत कसोटी कारकिर्दीत 350 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे.
अश्विनने हा कसोटी क्रिकेटमध्ये 350 विकेट्स किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा केवळ चौथा गोलंदाज ठरला आहे. याआधी भारताकडून केवळ अनिल कुंबळे, कपिल देव आणि हरभजन सिंग यांनी हा टप्पा पार केला आहे.
विशेष म्हणजे अश्विनने 350 कसोटी विकेट्सटचा टप्पा 66 कसोटी सामन्यात पूर्ण केला आहे. त्यामुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 350 विकेट्स घेण्याच्या मुथय्या मुरलीधरनच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. तसेच यामुऴे अश्विन भारताकडूनही सर्वात जलद 350 कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
याआधी भारताकडून सर्वात जलद 350 कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेच्या नावावर होता. कुंबळेने 77 कसोटी सामन्यात 350 विकेट्सचा टप्पा पार केला होता.
सध्या सुरु असलेल्या भारत दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना आज पाचव्या दिवशी पहिल्या सत्राखेरपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 8 बाद 117 धावा केल्या होत्या.
#भारताकडून सर्वात जलद 350 कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज –
66 सामने – आर अश्विन
77 सामने – अनिल कुंबळे
83 सामने – हरभजन सिंग
100 सामने – कपिल देव
#कसोटीमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
619 विकेट्स – अनिल कुंबळे
434 विकेट्स – कपिल देव
417 विकेट्स – हरभजन सिंग
350 विकेट्स – आर अश्विन
311 विकेट्स – झहिर खान






