नेदरलॅंड संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून या दोन संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा दूसरा सामना शनिवारी (२ एप्रिल) हॅमिल्टन येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-फलंदाज आणि कर्णधार टाॅम लाथम याने मोठा विक्रम करत इतिहास रचला आहे.
त्याने नेदरलॅंडविरुद्ध शतक ठोकले आणि १४० धावा करत नाबाद राहिला. त्याने ही कामगिरी त्याच्या वाढदिवसादिवशीच केली आहे. तो वाढदिवसादिवशी सर्वात मोठी खेळी खेळणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने अशी कामगिरी करुन भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडूलकरचा २४ वर्षांपूर्वीचा विक्रम तोडला आहे.
टाॅम लाथमने शनिवारी (२ एप्रिल) आपला ३० वा वाढदिवस साजरा केला. त्याला नेदरलॅंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दूसऱ्या एकदिवसीय सामन्यात नेदरलॅंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकात ९ गडी गमावत २६४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ १४६ धावा करुन ३४ षटकांतच सर्वबाद झाला आणि न्यूझीलंड संघ ११८ धावांनी जिंकला.
हॅमिल्टनच्या सेडाॅन पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात संघाचा कर्णधार टाॅम लाथमने १२३ चेंडूत १० चौकारांच्या आणि ५ षटकारांच्या मदतीने १४० धावा केल्या. त्याची ही वनडे कारकिर्दीतील आत्तापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे, जी त्याने त्याच्या वाढदिवसादिवशी खेळली आहे. भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडूलकरने २४ वर्षांपुर्वीच म्हणजे १९९८ साली शारजाह येथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आपल्या वाढदिवसादिवशी १३४ धावा केल्या होत्या. त्याचा हा सर्वोत्तम विक्रम मोडत त्याने ही खेळी खेळली आहे.
https://twitter.com/sparknzsport/status/1510169106838069248?s=20&t=IecuSFDgTajfekCKIsd5Lw
या दोन खेळाडूंशिवाय वाढदिवसादिवशी मोठी खेळी खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये राॅस टेलर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २०११ साली आपल्या वाढदिवसादिवशी १३१ धावा केल्या होत्या. तसेच श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्या याने २००८ मध्ये आपल्या वाढदिवसा दिवशी १३० धावा केल्या होत्या. तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच भारताच्या विनोद कांबळीने देखील आपल्या वाढदिवसादिवशी शतक ठोकले आहे. त्याने १९९३ साली एकदिवसीय सामन्यात १०० धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| चेन्नई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
Video: सहा वर्षांपूर्वी जगातील एकाही संघाला न जमलेला कारनामा विंडीजने केला होता