वेलिंग्टन। कालपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 71.1 षटकात 5 बाद 216 धावा केल्या आहेत. तसेच 51 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने अर्धशतकी खेळी केली आहे.
न्यूझीलंडने भारताला आज पहिल्या डावात 165 धावांवर रोखले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने सुरुवात सावध केली. मात्र 11 व्या षटकात इशांत शर्माने टॉम लॅथमला बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. परंतू त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि टॉम ब्लंडेलने डाव सावरला आणि दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली.
पण इशांतनेच ब्लंडेलला बाद करत ही जोडी तोडली. मात्र त्यानंतर विलियम्सनला 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या रॉस टेलरची साथ मिळाली. या दोघांनीही भारतीय गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागादीरी रचली. यावेळीही पुन्हा एकदा इशांतच भारताच्या मदतीला धावून आला. त्याने धोकादायक वाटणाऱ्या टेलरला 44 धावांवर बाद केले.
त्यानंतर काहीवेळातच अर्धशतकी खेळी करणारा विलियम्सनही मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा सुरेख झेल राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानावर आलेल्या रविंद्र जडेजाने घेतला. विलियम्सनने शानदार फलंदाजी करताना 153 चेंडूत 11 चौकारांसह 89 धावांची खेळी केली. त्याचे शतक 11 धावांनी थोडक्यात हुकले.
तो बाद झाल्यानंतर काही वेळातच आर अश्विनच्या गोलंदाजीवर हेन्री निकोल्स 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र बीजे वॉटलिंग आणि कॉलिन डी ग्रँडहोमने आणखी विकेट जाऊ न देता दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किल्ला लढवला.
तत्पूर्वी आज भारताने 56 व्या षटकापासून 5 बाद 122 धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत फलंदाजी करत होते. मात्र सामना सुरु झाल्यानंतर 59 व्या षटकात रहाणे आणि पंतमध्ये एकेरी धाव काढण्याच्या नादात झालेल्या गोंधळामुळे पंत(19) धावबाद झाला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर आर अश्विनला टीम साऊथीने त्रिफळाचीत केले. तर रहाणे 63 व्या षटकात साऊथीच्याच चेंडूवर 46 धावांवर असताना झेलबाद झाला.
यानंतर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतू इशांत 23 चेंडू खेळत 5 धावा केल्यानंतर काईल जेमिसनच्या चेंडूवर झेलबाद झाला. तर शमी 20 चेंडूत 21 धावा करुन साऊथीच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याआधी काल विराट कोहली(2), चेतेश्वर पुजारा(11), मयंक अगरवाल(34) हनुमा विहारी(7) आणि पृथ्वी शॉ(16) यांनी विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे भारताचा डाव 165 धावांवर संपुष्टात आला.
न्यूझीलंडकडून या डावात साऊथी आणि जेमिसनने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्टने 1 विकेट घेतली.
साहाचे चुकले कुठे? भारताच्या दिग्गजाने पंतच्या सहाभागाबद्दल उपस्थित केला प्रश्न
वाचा- 👉https://t.co/LR8uzFYs4q👈#म #मराठी #Cricket @Wriddhipops @RishabhPant17— Maha Sports (@Maha_Sports) February 22, 2020
विराट कोहलीने केला खूलासा, मैदानाबाहेर बसून विलियम्सनबरोबर मारल्या या विषयावर गप्पा
वाचा- 👉https://t.co/OyULSxcPip👈#म #मराठी #Cricket #INDvsNZ @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) February 22, 2020