न्यूझीलंड दौऱ्यात आज भारताला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील क्राईस्टचर्च येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. तसेच ही मालिकाही 2-0 अशा फरकाने गमवावी लागली. या मालिकेत भारताचे फलंदाज मोठ्या धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले.
तसेच भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही मोठ्या धावा करण्यापासून रोखण्यात न्यूझीलंडचे गोलंदाज यशस्वी ठरले. याबद्दल काल दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्टने आनंद व्यक्त केला आहे. विराटने या मालिकेत 4 डावात मिळून फक्त 38 धावा केल्या.
बोल्टने (Trent Boult) कोहलीविरूद्ध न्यूझीलंड संघाने आखलेल्या रणनीतीबद्दल सांगितले आहे. “विराटसारख्या जागतिक दर्जाच्या फलंदाजाला दबावाखाली चूका करताना पाहून खूप छान वाटले.” असे तो यावेळी म्हणाला आहे.
बोल्टला जेव्हा विचारण्यात आले की विराटवरती दबाव आणण्यामागचे रहस्य काय होते? यावर तो म्हणाला, “विराटला जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये गणले जाते. त्यामुळे त्याला आम्ही चौकार, षटकार मारण्यापासून रोखले. आम्ही अशा प्रकारचे चेंडू खूप कमी टाकले आणि विराटला दबावाखाली आणले. त्याला चुका करताना बघून खूप छान वाटत होते.”असेही बोल्ट पुढे म्हणाला.
भारतीय फलंदाजांना वरच्या बाजूने येणाऱ्या चेंडूंना खेळणे कठीण जात होते. यावर बोल्ट म्हणाला, “कदाचीत भारतीय संघाला कमी गतीच्या खेळपट्टीवर खेळण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांना ही खेळपट्टी समजून घेण्यास वेळ लागला. मात्र, जर मी भारताच्या खेळपट्टीवर अशी गोलंदाजी केली तर तिथे परिस्थिती वेगळी असेल.”
बोल्टने या सामन्याच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर या सामन्यात त्याने एकूण 6 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–न्यूझीलंडची कसोटी चॅम्पियनशीपमध्ये मोठी भरारी, जाणून घ्या टीम इंडियाचे गुण
–भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा, या खेळाडूला मिळाली पहिल्यांदाच संधी
–विराटचं असं वागणं बरं नव्हं! आता या व्यक्तीवर काढला पराभवाचा राग