तुम्ही ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज आहात.. दिग्गज ग्लेन मॅकग्रा दुखापतग्रस्त झाल्याने तुम्हाला सामन्यात खेळायला संधी मिळते.. ऑस्ट्रेलियाचा ३६१ वा कसोटीपटू म्हणून तुम्ही डोक्यावर टोपी चढवता.. रावळपिंडीसारख्या फलंदाजांसाठी नंदनवन असणाऱ्या खेळपट्टीवर तुम्हाला पदार्पणाची संधी मिळते.. ज्या खेळपट्टीवर दोन्ही संघाचे फलंदाज टिच्चून फलंदाजी करत असतात, त्याच खेळपट्टीवर तुम्ही पदार्पणाच्या सामन्यात हॅट्रिक घेता.. खरंच, एखाद्या पहाटे पाहिलेल्या गोड स्वप्नासारखी गोष्ट आहे ही.. पण सत्यही सत्यात उतरलेले एका खेळाडूने पाहिले… ९ ऑक्टोबर १९९४ साली पदार्पणात हॅट्रिक घेणारा तो वेगवान गोलंदाज होता डेमियन फ्लेमिंग.
मार्क टेलरच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा संघ पाच कसोटी सामने आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दरम्यान नियोजित तिरंगी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला पोहोचला होता. ऑस्ट्रेलियासाठी या मालिकेची सुरुवात अत्यंत वाईट झाली. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. दुष्काळात तेरावा म्हणून की काय, ग्लेन मॅकग्रा त्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला. काहीशा खचलेल्या मनोबलाने ऑस्ट्रेलियन संघ दुसरी कसोटी खेळण्यासाठी रावळपिंडीला रवाना झाला.
पहिला पराभव पचवल्यानंतर दुप्पट विश्वासाने मैदानावर उतरलेला ऑसी संघ…
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मार्क टेलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णयघेतला. मायकेल स्लेटरच्या ११० आणि स्टीव्ह वॉच्या ९८ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळ्यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५२१ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार टेलर ५८ , मार्क वॉ ६८, मायकल बेवन ७० आणि इयान हिली ५८ यांची अर्धशतके देखील उपयोगी ठरली. धावफलकावर लावलेल्या भल्यामोठ्या धावांच्या आत्मविश्वासाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी एकदम उत्साहाने गोलंदाजी केली. क्रेग मॅकडरमॉटने ७४ धावांत चार तर डेमियन फ्लेमिंगने ७५ धावांत ४ बळी घेत पाकिस्तानचा डाव २६० धावांवर संपवला.
फुल फॉर्ममध्ये होते कांगारू गोलंदाज आणि….
पहिल्या कसोटीत इंझमाम-उल-हक आणि मुश्ताक अहमदने नाबाद ६७ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा विजयाचा घास हिसकावून संघाला एका गड्याने विजयी केले होते. २६१ धावांनी पिछाडीवर पडलेल्या पाकिस्तानला, दुसर्या कसोटीतील पराभव टाळण्यासाठी जवळपास सात सत्रे पाकिस्तानला खेळून काढायची होती. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज मात्र, पूर्ण लयीमध्ये दिसत होते.
फॉलोऑननंतर पाकिस्तानचा दुसरा डाव सुरू झाल्यावर पाकिस्तानचे कर्णधार सलीम मलिक यांना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मार्क टेलरने २० धावांवर असताना जीवदान दिले. यानंतर मात्र मलिक यांनी नांगर टाकला. तब्बल सात तास तेवीस मिनिटे फलंदाजी करत मलिक यांनी २३७ धावांची दमदार द्विशतकी खेळी केली. आमीर सोहेल, आमिर मलिक आणि सईद अन्वर यांनी अर्धशतके झळकावत कर्णधाराला योग्य साथ दिली. पहिल्या डावात ५ तास ३९ मिनिटात सर्वबाद झालेल्या पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात साडेदहा तासाहून अधिक फलंदाजी करताना ५३७ धावा उभारल्या.
…अखेर फ्लेमिंगचे स्वप्न सत्यात
पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात दरम्यान, आपल्या २३ व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर फ्लेमिंगने आमीर मलिक आणि इंजमाम यांना बाद केले. आमीरने फ्लेमिंगचा फ्लिक केलेला चेंडू सरळ मायकल बेवनच्या हाती विसावला. अखेरच्या चेंडूवर, नवीन फलंदाज इंजमाम उल हकला त्याने पायचीत पकडले. फ्लेमिंगने स्वतःच्या २४ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मलिक यांची द्विशतकी खेळी संपुष्टात आणली.
आमीर मलिकला बाद करताच फ्लेमिंग कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात हॅट्रीक घेणारा अवघा तिसरा गोलंदाज ठरला. त्याआधी, इंग्लंडच्या मोरीस अलोम यांनी १९२९-३० मध्ये न्यूझीलंड विरुद्ध तर १९७६-७७ मध्ये न्यूझीलंडच्या पीटर पथेरिक यांनी पाकिस्तान विरुद्ध अशी कामगिरी केली होती.
पुढे, रावळपिंडी आणि लाहोर कसोटी अनिर्णित राहिल्याने कराची कसोटीतील विजयामुळे पाकिस्तानने ती मालिका आपल्या नावे केली. खोर्याने धावा काढल्या गेलेल्या या मालिकेतील डेमियन फ्लेमिंगची ती मैत्री क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहिली.
वाचा- ‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी