ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा जागतिक क्रिकेटमधील बलाढ्य संघांमध्ये समावेश होतो. हे संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील 10व्या सामन्यात 12 ऑक्टोबर रोजी आमने-सामने असणार आहेत. उभय संघातील सामना लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअम येथे खेळला जाईल. यापूर्वी दोन्ही संघांची पहिल्या सामन्यातील कामगिरी आणि लखनऊच्या खेळपट्टीविषयी माहिती जाणून घेऊयात…
दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये
मागील एक-दीड महिन्यांपासून दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाचे फलंदाज वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडताना दिसत आहेत. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात संघाने 428 धावसंख्येचा डोंगर उभारला होता. यामध्ये त्यांच्या तिन्ही फलंदाजांनी शतक ठोकले होते. तसेच, यापूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील वनडे मालिकाही 3-2ने खिशात घातली होती. या मालिकेत सलग 3 सामन्यात त्यांनी 300हून अधिक धावसंख्या उभारली होती. वरच्या फळीतील क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बावुमा चांगली सुरुवात करण्यात पटाईत आहेत. तसेच, संघाची मधली फळी खूपच विस्फोटक आहे. त्यात रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम आणि डेविड मिलर यांचा समावेश आहे. मार्करमने श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 49 चेंडूत विश्वचषकातील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला त्याच्यापासून सावध राहावे लागेल.
ऑस्ट्रेलिया दबावात
भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) संघ तिन्ही विभागात अपयशी ठरला होता. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे त्यांना सर्व विकेट्स गमावत 199 धावांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर गोलंदाजांनीही चांगली सुरुवात केली. मात्र, क्षेत्ररक्षकांची साथ न मिळाल्याने त्यांनीही लय गमावली. ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठी चिंता फिरकी विभाग आहे. संघात ऍडम झम्पा हा एकमेव तज्ज्ञ फिरकीपटू आहे. ग्लेन मॅक्सवेलसाठी हे वर्ष चेंडूतून शानदार ठरले होते, पण भारताविरुद्ध तोही प्रभाव टाकू शकला नाही. आता लखनऊच्या खेळपट्टीवर पॅट कमिन्स याच्या नेतृत्वातील संघ कसा खेळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
लखनऊच्या मैदानाची आकडेवारी
लखनऊ मैदानात आतापर्यंत 9 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यानप्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना 2 सामनेच जिंकता आले आहेत. या मैदानावर आव्हानाचा पाठलाग करणे सोपे जाते. लखनऊमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम वेस्ट इंडिज संघाच्या नावावर आहे. त्यांनी अफगाणिस्तानविरुद्ध 253 धावा केल्या होत्या. या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाला एक सामन्याचा अनुभव आहे, तर ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदा लखनऊच्या मैदानावर खेळेल.
लखनऊची खेळपट्टी
लखनऊमध्ये नेहमीच फिरकीपटूंचा बोलबाला असतो. आयपीएल 2023 स्पर्धेतही पाहायला मिळाले आहे की, या खेळपट्टीवर चेंडू खूपच वळतो. आयसीसी स्पर्धा असल्यामुळे ही तटस्थ खेळपट्टी असेल. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या धावसंख्येची अपेक्षा व्यक्त केली जाऊ शकते. (ODI World Cup 2023 australia vs south africa pitch report lucknow know here about weather forecast)
हेही वाचा-
मोठी बातमी! एशियन गेम्समध्ये भारताला सुवर्ण पदक देण्यावर अफगाणी खेळाडूचा आक्षेप; म्हणाला…
रिझवानचा भीमपराक्रम! श्रीलंकेविरुद्धच्या तडाखेबंद शतकामुळे केला ‘हा’ विक्रम, 18 वर्षे जुना Record उद्ध्वस्त