अलीकडेच ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत पराभूत करणारा दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फलंदाजी म्हणा किंवा गोलंदाजी संघाचे खेळाडू प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. अशात विश्वचषकातील चौथा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात खेळला गेला. या सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळाली. शेवटी सामना आफ्रिकेच्या पारड्यात पडला. त्यांनी 102 धावांनी दणदणीत विजय साकारला. मात्र, लक्षवेधी बाब अशी की, या सामन्यात एक नाही, तर अनेक विक्रम रचले गेले. चला तर त्या विक्रमांवर नजर टाकूयात…
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या नाकीनऊ
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 428 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघ 44.5 षटकात सर्वबाद होऊन फक्त 326 धावाच करू शकला. 429 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघ दबाव सहन करू शकला नाही. त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. श्रीलंकेकडून सलामीला उतरलेला पथुम निसांका एकही धाव न करता तंबूत परतला.
मात्र, त्याच्यानंतर फलंदाजीला आलेल्या कुसल मेंडिस याने आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. त्याने 42 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी साकारली. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. तसेच, चरिथ असलंका यानेही 79 धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त कर्णधार दसून शनाका याच्या बॅटमधूनही 68 धावा निघाल्या. यांच्याव्यतिरिक्त इतर एकही फलंदाज खास प्रदर्शन करू शकला नाही.
दक्षिण आफ्रिकेची विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम मोडीत काढला. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 5 षटकात 428 धावा चोपल्या. विश्वचषकाच्या इतिहासात याहून अधिक धावसंख्या कधीही बनली नाहीये.
दक्षिण आफ्रिकेची मोठी धावसंख्या आणि तिघांचे शतक
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत सर्वप्रथम 400 धावांपर्यंत पोहोचण्याचा विक्रमही दक्षिण आफ्रिका संघानेच केला आहे. तसेच, दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकाच्या इतिहासातील असा पहिलाच संघ बनला, ज्याच्या तीन फलंदाजांनी एकाच सामन्यात शतक ठोकले. या सामन्यात आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक याने 100, रासी व्हॅन डर ड्युसेन याने 108 आणि एडेन मार्करम याने 106 धावांची शतकी खेळी साकारली. याव्यतिरिक्त हेन्रीच क्लासेन यानेही 32 आणि डेविड मिलर याने नाबाद 39 धावांची वादळी खेळी साकारली.
याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनी एकाच सामन्यात शतक करण्याची ही एकूण तिसरी वेळ ठरली. (odi world cup 2023 sa vs sl world records south africa beat sri lanka by 102 runs)
हेही वाचा-
श्रीलंकेच्या नांग्या 102 धावांनी ठेचल्यानंतर बावुमाची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्हाला…’
दमदार दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्डकपमध्ये विजयी प्रारंभ! मेंडीस-असलंकासह शनाकाची झुंज व्यर्थ






