गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात तळातील ओदीशा एफसीने बुधवारी केरला ब्लास्टर्सला 2-2 असे बरोबरीत रोखले. दिएगो मॉरीसिओ याने दोन्ही गोल केले. बाद फेरीच्या आशा मावळल्या असल्या तरी दोन्ही संघांनी चुरशीने खेळ केला.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. ओदीशाचे खाते पहिल्या सत्रातील अखेरच्या मिनिटाला आघाडी फळीतील ब्राझीलचा 29 वर्षीय खेळाडू दिएगो मॉरीसिओ याने उघडले. दुसऱ्या सत्रात ब्लास्टर्सला आघाडी फळीतील ऑस्ट्रेलियाचा 25 वर्षीय खेळाडू जॉर्डन मरे याने बरोबरी साधून दिली. त्यानंतर ब्लास्टर्सचा दुसरा गोल आघाडी फळीतील ब्रिटनचा 33 वर्षीय खेळाडू गॅरी हुपर याने केला. ओदीशाला 74व्या मिनिटाला मॉरीसिओच्या दुसऱ्या गोलमुळे बरोबरी साधता आली.
ब्लास्टर्सने 17 सामन्यांत सातवी बरोबरी साधली असून तीन विजय व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 16 गुण झाले. त्यांनी ईस्ट बंगालला गुणांवर गाठले आणि जास्त गोलसंख्येमुळे मागे टाकले. ईस्ट बंगालचा एक सामना बाकी आहे. दोन्ही संघांचा गोलफरक उणे सात असा समान आहे. ब्लास्टर्सचा उणे 7 (22-29), तर ईस्ट बंगालचा उणे 7 (14-21) असा समान गोलफरक आहे. यात ब्लास्टर्सने केलेले गोल जास्त आहेत. त्यामुळे ब्लास्टर्सला नववे स्थान मिळाले.
ओदीशाचे अखेरचे 11वे स्थान कायम राहिले. 16 सामन्यांत त्यांची सहावी बरोबरी असून एक विजय व नऊ पराभव अशा कामगिरीसह त्यांचे नऊ गुण झाले.
खाते उघडण्याची शर्यत ओदीशाने जिंकली. मध्यरक्षक जेरी माहमिंगथांगा याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवून अप्रतिम पास दिल्यावर मॉरीसिओने कौशल्य प्रदर्शित केले. त्याने धुर्तपणे चेंडूवरील ताबा कायम ठेवत आगेकूच केली आणि पुढे सरसावलेला प्रतिस्पर्धी गोलरक्षक अल्बिनो गोम्स याला चकविले.
ब्लास्टर्सने दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी बरोबरी साधली. स्ट्रायकर गॅरी हुपर याने चेंडूवर ताबा मिळवित ओदीशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याच्यावर दडपण आणले. अर्शदीप पुढे सरसावताच त्याने गोलक्षेत्रात मैदानालगत क्रॉस शॉट मारला. त्यावेळी ओदीशाचा बचावपटू महंमद साजीद धोत चेंडूपासून सर्वांत जवळ होता, पण पाठीमागून ब्लास्टर्सचा स्ट्रायकर मरे धावत येत असल्याचे त्याच्या लक्षातच आले नाही. याचा फायदा घेत मरेने फिनिशींग केले.
त्यानंतर ब्लास्टर्सने आघाडी घेण्यात यश मिळविले. मध्यरक्षक व्हिसेंट गोमेझ याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. त्याने साहल अब्दुल समद याला पास दिला. त्याच्याकडून पास मिळताच हुपरने पहिल्या प्रयत्नात चेंडूवर ताबा मिळवून फिनिशींग केले.
ओदीशाने बरोबरी साधण्यास फार वेळ घेतला नाही. मध्यरक्षक विनीत राय याने ही चाल रचली. त्याने उजवीकडून मध्यरक्षक ब्रॅडन इनमन याला पास दिला. त्याच्याकडून चेंडू मिळताच मॉरीसिओने सहजतेने फटका मारत अल्बिनोला चकविले.
सामन्याची सुरुवात चुरशीने झाली. 12व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा बचावपटू संदीप सिंग आणि मध्यरक्षक के. पी. राहुल यांनी चाल रचली. संदीपने आगेकूच केली, पण ओदीशाचा बचावपटू हेंड्री अँटनी याने त्याला रोखले.
21व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा मध्यरक्षक योंद्रेम्बेम देनेचंद्रा याने ओदीशाचा मध्यरक्षक जेरी माहमिंगथांगा याला पाडले. त्यामुळे ओदीशा फ्री किक बहाल करण्यात आली. बचावपटू राकेश प्रधान याने ती घेतली, पण त्याने खराब फटका मारल्यामुळे चेंडू गोलपोस्टवरून बाहेर गेला.
30व्या मिनिटाला ओदीशाचा बचावपटू स्टीव्हन टेलर याने चेंडूवरील ताबा गमावला. त्यामुळे ब्लास्टर्सचा मध्यरक्षक साहल अब्दुल समद याने संधी साधली आणि स्ट्रायकर गॅरी हुपर याला पास दिला. हुपरने मारलेला फटका मात्र स्वैर होता.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून बेंगळुरू पराभूत
आयएसएल २०२०-२१ : सहा गोलांच्या थरारात मुंबई सिटी-गोवा बरोबरी
आयएसएल २०२०-२१ : हैदराबाद-नॉर्थईस्ट युनायटेडची गोलशून्य बरोबरी