सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात नॉटिंघम येथे पहिला कसोटी सामना चालू आहे. नाणेफेक जिंकून पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला भारतीय गोलंदाजांनी १८३ धावतच गुंडाळले होते. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी देखील भारतीय संघाला २७८ धावांवर रोखले. ज्यात इंग्लंडचा गोलंदाज ओली रॉबिन्सन याने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. रोबिन्सनने त्याच्या कसोटी कारकीर्द पहिल्यांदाच ५ विकेट्स घेतल्या आहेत.
विशेष म्हणजे २७ वर्षीय रॉबिन्सनवर एकेकाळी क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. कारण १० वर्षांपूर्वी रॉबिन्सनने ट्विटरवर वर्णभेदी ट्विट केले होते, जे अचानकपणे समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्यामुळे त्याच्यावर ८ सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती.
त्यानंतर रॉबिन्सनचा मुद्दा खूप गाजला तेव्हा एका पाठोपाठ इतर खेळाडूंचे देखील जुने ट्विट्स व्हायरल होऊ लागले होते. त्यानंतर रॉबिनसनने याबाबत माफी देखील मागितली. यानंतर त्याला भारत विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. एक वेळ अशी होती जेव्हा त्याला स्वतःलाही वाटत होते की त्याची कारकिर्द संपुष्टात आली आहे. पण आता त्याला पुन्हा संधी मिळाल्याने तो खुष आहे.
कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर रॉबिन्सन म्हणाला, “एक वेळ होती जेव्हा मी सतत माझ्या वकिलांशी बोलत होतो. तेव्हा माझ्यावर काही वर्षांसाठी बंदी घातली जाऊ शकते, याबाबत सतत चर्चा असायची. जर असे झाले असते तर मला पुन्हा कधीच इंग्लंडकडून खेळण्याची संधी मिळाली नसती.”
याबाबत कारण देत तो पुढे म्हणाला, “काही वर्षातच मी ३० वर्षांचा झालो असतो. एवढ्या कालावधीत कोणताही नवीन खेळाडू येऊन संघात स्थान मिळवू शकला असता. त्यानंतर इंग्लंड संघात माझे पुनरागमन होणे अत्यंत कठीण झाले असते. त्यामुळे मला माझी कारकिर्द संपल्याची भीती वाटत होती. परंतु माझे नशीब चांगले आहे. मला संघात पुन्हा संधी मिळाली आणि आता सर्व काही सुरळीत चालू आहे.”
रॉबिन्सनने भारताविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत ८५ धावांवर ५ विकेट घेतल्या आहेत. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कामगिरी आहे. असे असले तरी रॉबिन्सनने या काळाला त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सांगितले आहे. तो म्हणाला, “खरं सांगायचे झाले तर दरम्यानच्या काळ केवळ माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या परिवारासाठी देखील खूप कठीण काळ होता. परंतु यातून मी खूप काही शिकलो.”
“दहा वर्षांपूर्वीचा मी आणि आताचा मी, यांच्यात खूप फरक झाला आहे. तेव्हा मी केवळ १८ वर्षांचा युवक होतो. तेव्हा माझ्याकडून ट्विट बाबतच नाही तर, खूप गोष्टीत चुका झाल्यात. परंतु गेल्या १० वर्षात मी स्वतःमध्ये खूप बदल केले. एक व्यक्ती म्हणून स्वतःमध्ये खूप बदल झाला आहे. मी एक वडील म्हणून देखील स्वतःमध्ये बदल घडवत आहे. मी माझ्यातील चुकांना सुधारत आहे.” असेही तो म्हणाला.
महत्वाच्या बातम्या –
–लाईव्ह सामन्यात १००% मनोरंजन! रिषभ मैदानातच मारू लागला बेडूक उड्या, रोहित-विराट अचंबित
–ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजाने शाकिबला दिवसा दाखवले चांदणे, लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद
–राहुलचे ‘लेडी लक’, अथियाने स्टेडियममधून केले चीयर; फलंदाजाने नॉटिंघम कसोटीत चोपल्या ११० धावा