जगातील सर्वात प्रतिष्ठित कसोटी मालिका असलेली ऍशेस मालिका (Ashes Series) सध्या ऑस्ट्रेलियात सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिले तीनही सामने जिंकत मालिका नावावर केली असून, चौथा सामना सिडनी (Sydney Test) येथे खेळला जातोय. या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसानंतर विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. इंग्लंड संघासाठी व खेळाडूंसाठी ही मालिका विसरण्यासारखे असली तरी, इंग्लंडचा युवा फलंदाज ओली पोप (Ollie Pope) याच्यासाठी चौथ्या कसोटीत एक अविस्मरणीय घटना घडली.
सिडनी येथील चौथ्या कसोटीत इंग्लंडच्या संघात जोस बटलर व जॉनी बेअरस्टो असे दोन नियमित यष्टीरक्षक होते. यामध्ये बटलर यष्टीरक्षकाची भूमिका बजावत होता. मात्र, बटलर व बेअरस्टो दुखापतग्रस्त (Buttler & Bairstow Injured) झाल्याने इंग्लंड संघ व्यवस्थापनाला चालू सामन्यात राखीव खेळाडू असलेल्या ओली पोपकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी द्यावी लागली. पोपने यापूर्वी केवळ सहा प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये यष्टिरक्षक म्हणून जबाबदारी निभावली होती.
अचानकपणे यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरावे लागले तरी पोपने आपल्या यष्टिरक्षणाने चक्क एका विश्वविक्रमाची बरोबरी केली. (Ollie Pope Equal World Record) राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरताना त्याने चार झेल टिपले. यासह त्याने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू युनूस खान (Younis Khan) व भारताचा अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान (Wriddhiman Saha) साहा यांच्या विक्रमाची बरोबरी केली. या दोन्ही खेळाडूंनी देखील राखीव खेळाडू म्हणून मैदानात उतरत कसोटीच्या एका डावात चार झेल टिपण्याची किमया केली होते. युनूस खानने वीस वर्षांपूर्वी बांगलादेशविरुद्ध तर साहाने २०१४-२०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथेच ही कामगिरी नोंदवलेली.
सोशल मीडियावर झाले कौतुक
पोप याने या सामन्यात केलेल्या यष्टीरक्षणामूळे सोशल मीडियावर त्याचे चांगलेच कौतुक होत आहे. अनेकांनी त्याला इंग्लंडचा नियमित यष्टीरक्षक बनवावे असे म्हटले, तर काहींनी त्याच्यामुळे जोस बटलर याची कसोटी संघातील जागा धोक्यात आल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-