ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे व्यावसायिक टी२० लीग असलेल्या बिग बॅश लीगचा (Big Bash League) अकरावा हंगाम सध्या खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियात कोरोना रुग्ण वाढत असतानाही ही स्पर्धा सुरु असून, काही प्रमुख खेळाडू कोरोनाबाधित झाले आहेत. काही दिवसांपासून ही स्पर्धा स्थगित केली जाणार का? अशी चर्चा सुरू आहे. आता याच पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Corona In Big Bash)
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले (Nick Hockley) यांनी स्पर्धेच्या उर्वरित हंगामाबाबत बोलताना म्हटले,
“कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता उर्वरित स्पर्धा आम्ही केवळ मेलबर्नमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून यावर काम सुरू होते. हळूहळू सर्व संघ मेलबर्नमध्ये एकत्र येत आहेत. स्पर्धा काही दिवस थांबली तरी, एकाच शहरात सर्व सामने खेळवण्यात सोपे जाईल.”
हॉकले पुढे म्हणाले,
“मागील आठवड्यात अचानकपणे अनेक खेळाडू कोरोनाबाधित आढळले. आम्ही स्पर्धा सुरू ठेवली असली तरी सर्वोच्च प्राधान्य खेळाडूंच्या सुरक्षिततेला आहे. आयोजनात बदल करण्याचे मुख्य कारण म्हणजे स्पर्धा चालू राहावी आणि खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ या आजाराच्या विळख्यात येऊ नयेत, असा आमचा मानस आहे.”
बीबीएलमध्ये कोरोनाचा विस्फोट
सध्या बिग बॅश लीगमध्ये कोरोनाचा विस्फोट झालेला पाहायला मिळत आहे. स्पर्धेतील आठ पैकी सात संघांतील खेळाडू आणि कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याचा सर्वाधिक फटका मेलबन स्टार्स (Melbourne Stars) संघाला बसला आहे. संघाचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याच्यासह तब्बल १३ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आहेत. याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या ऍशेस मालिकेतील काही खेळाडू व कर्मचारी हे देखील या तडाख्यातून बचावले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज ट्रेविस हेड तसेच इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड हे कोरोनाबाधित असल्यामुळे संघातून बाहेर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-