भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी, दोन्ही संघांना धक्के बसले आहेत. सर्वप्रथम भारतीय सलामीवीर शुबमन गिल दुखापतीमुळे संपूर्ण दौर्याबाहेर गेल्यानंतर, इंग्लंड संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज ओली पोप मांडीचे स्नायू ताणले गेल्याने मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर पडला. पोप या दुखापतीमुळे टी२० ब्लास्टचे सामनेदेखील खेळू शकणार नाही.
पहिल्या सामन्याला मुकणार पोप
ओली पोपची दुखापत गंभीर असल्याचे बोलले जात असून, ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत ओली पोप खेळू शकणार नसल्याचे वृत्त आहे. हा २३ वर्षीय फलंदाज टी२० ब्लास्टमध्ये सरेकडून खेळत होता आणि केंटविरुद्धच्या सामन्यात तो जखमी झाला. भारत-इंग्लंड मालिका सुरू होईपर्यंत पोप मैदानात उतरू शकणार नाही, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) आपल्या निवेदनात म्हटले आहे.
या खेळाडूला मिळू शकते संधी
ओली पोप हा इंग्लंडच्या कसोटी संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू मानला जातो. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी इंग्लंड संघ व्यवस्थापनाचा विश्वासू फलंदाज आहे. तो पहिल्या कसोटीतून बाहेर गेल्यानंतर त्याच्या जागी जागतिक टी२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असणारा डेव्हिड मलान त्याची जागा घेऊ शकतो. मलान हा सध्या स्वप्नवत फॉर्ममधून जात आहे. सध्या इंग्लंडच्या मध्यफळीत कर्णधार जो रूट, झॅक क्राऊली, डॅन लॉरेन्स हे खेळाडू उपलब्ध आहेत. अष्टपैलू बेन स्टोक्स याने पुनरागमन केल्यामुळे तो देखील ही जागा पटकावू शकतो.
अशी राहिली आहे कारकीर्द
ओली पोप याला इंग्लंड क्रिकेटचे भविष्य मानले जाते. मात्र, कसोटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी काही खास राहिली नाही. पोपने आतापर्यंत १९ कसोटीत अवघ्या ३१.५० च्या सरासरीने ८८२ धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. पोपची भारत दौऱ्यावरील कामगिरी खूपच खराब होती. तो भारतात खेळलेल्या ४ कसोटी सामन्यांमध्ये १९.१२ च्या सरासरीने केवळ १५३ धावा करू शकला. त्याला आठ डावांमध्ये एकही अर्धशतक करता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा गावस्कर म्हणाले होते, ‘ए चल फूट…’, थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत वीरूकडून बड्डेच्या हटके शुभेच्छा