न्यूझीलंड विरुद्ध एकमेव कसोटी खेळल्यानंतर आठ वर्ष जुन्या विवादित ट्विटमुळे निलंबित झालेला इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाच्या मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करणार्या समितीने याबाबत रॉबिन्सनला दिलासा दिला असून तो भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघात समाविष्ट होऊ शकतो. ४ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे.
काय होते प्रकरण?
ओली रॉबिन्सनने आठ वर्षापूर्वी आपल्या ट्विटर हँडलवरून वर्णभेदी ट्विट केले होते. त्यानंतर रॉबिन्सनने न्यूझीलंड विरुद्ध यावर्षी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर हे ट्विट्स व्हायरल झाली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्याला निलंबित करण्यात आलेले. या प्रकरणावर इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. तर, इंग्लंडच्या काही खेळाडूंनी देखील त्याच्यावर झालेली कारवाई अति झाल्याचे म्हटले होते. रॉबिन्सनने देखील पुढे येऊन आपल्याकडून नकळतपणे हे ट्विट केले गेले होते असे म्हणत, माफी मागितली होती.
चौकशीअंती झाला हा निर्णय
रॉबिन्सनवर चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. चौकशी समितीने या प्रकरणाचा तपास पूर्ण करताना निकाल देत सांगितले, ‘ओली रॉबिन्सनवर ८ सामने खेळण्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धचा एक कसोटी सामना, तर ससेक्ससाठीचे टी२० ब्लास्टमधील दोन सामने यांचा समावेश केला गेला असून, उर्वरित पाच सामन्यांचे निलंबन पुढील दोन वर्षासाठी राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तो आता देशासाठी खेळू शकतो.’
निलंबन झाल्यानंतर रॉबिन्सनने अचानकपणे क्रिकेटमधून ब्रेक घेत असल्याचे सांगितले होते.
अशी राहिली आहे कारकीर्द
सध्या २७ वर्षाचा असलेला ओली रॉबिन्सनने २०१३ मध्ये यॉर्कशायरसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केल्यानंतर पुढील वर्षी हॅम्पशायरचेही प्रतिनिधित्व केले. २०१५ पासून तो ससेक्स संघाचा भाग आहे. त्याने आत्तापर्यंत ६४ प्रथम श्रेणी सामने खेळताना २८६ बळी मिळवले आहेत. सोबतच त्याच्या नावे १ शतक व ७ अर्धशतके देखील आहेत. त्याने खेळलेल्या एकमेव कसोटीत देखील ७ बळी व ४२ धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी इतिहासातील पहिली धाव अन् पहिले शतक चोपले, तरीही फक्त ३ सामन्यांवर संपली कारकिर्द
स्मिथचे क्रिकेटसाठी समर्पण, वेदना होत असूनही औषध घेऊन खेळले आयपीएल सामने
मंदीत चांदी! बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटपटूंची वाढवणार पगार, एका दिवसाचे मिळणार ६० हजार