टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने चांगली कामगिरी करत कांस्य पदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाचा सदस्य असलेल्या रुपिंदरपाल सिंगने गुरुवारी (३० सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली. त्याने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून या निवृत्तीची माहिती सर्वाना दिली आहे. युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ असल्याचे त्याने या ट्वीटर पोस्टमध्ये लिहिले आहे.
त्याने त्याच्या ट्वीटर पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मागचे काही महिने माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले होते. टोकियोमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत पोडियमवर उभं राहणं माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता आणि मी त्याला कधीच विसरू शकत नाही. माझे असे मत आहे की, ही वेळ युवा आणि प्रतिभाशाली खेळाडूंना संधी देण्याची आहे, ज्यामुळे त्यांनाही त्या गोष्टीचा अनुभव घेता येईळ, जो मी १३ वर्षांपासून भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुभवला आहे.’
रुपिंदर पाल सिंग सर्वोत्तम ड्रॅग फ्लिकर्स पैकी एक
रुपिंदरपाल सिंगचे नाव भारताच्या सर्वात यशस्वी ड्रॅग फ्लिकर्समध्ये घेतले जाते. त्याने त्याच्या हाॅकी कारकिर्दीला २००८ मध्ये सुरुवात केली होती. आतापर्यंत त्याने भारतीय संघासाठी २२३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये ११९ गोल केले आहेत.
चंदिगडमधून २००२ मध्ये केली हॉकी खेळायला सुरुवात
रुपिंदरपाल २००२ मध्ये पहिल्यांदा चंदिगड हॉकी अकादमीमध्ये सहभागी झाला होता. त्याने येथे चांगल्या हॉकीचे प्रदर्शन केले आणि २००७ मध्ये जूनियर हॉकी संघात जागा पटकावली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघासाठी खेळताना रुपिंदरपालने एकूण चार गोल केले आणि यापैकी दोन गोल स्ट्रोकच्या माध्यमातून केले होते. हे दुसरे ऑलिम्पिक होते, ज्यात रुपिंदर पाल सिंगने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
कोच म्हणाले, हॉकीमध्ये चांगला प्रवास राहिला
चंदिगडमध्ये सेक्टर ४२ मध्ये असलेल्या हॉकी अकादमीचे सध्याचे कोच गुरिंदर सिंग यांनी रुपिंदरविषयी बोलताना सांगितले की, “जेव्हा तो अकादमीमध्ये होता तेव्हा त्याला सर्व बाॅब या नावाने ओळखत होते. हॉकीमध्ये त्याचा प्रवास चांगला राहिला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याचा प्रवास चांगला राहिला आहे. त्याने योग्य वेळी संन्यास घेतला.”
रुपिंदरपाल निवृत्त झाल्याने भारतीय संघात आता केवळ कर्णधार मनप्रीत व गोलरक्षक श्रीजेश हेच अनुभवी खेळाडू बाकी राहिले आहेत.