भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचा नवा अध्यक्ष बनणार असल्याचे आता पक्के झाले आहे. तो बीसीसीआयचा अध्यक्ष बनल्याची अधिकृत घोषणा 23 ऑक्टोबरला केली जाणार आहे.
अध्यपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कोलकताला परतल्यावर इडन गार्डनवर पत्रकारांशी बोलताना गांगुलीने भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या भविष्याबाबतही भाष्य केले आहे.
गांगुली म्हणाला, ‘मी जेव्हा 24 ऑक्टोबरला निवड समीतीला भेटेल तेव्हा मला कळेल. आम्हाला निवड समीती काय विचार करत आहे हे समजून घ्यायला हवे. त्यानंतर मी माझे मत मांडेल.’
तसेच गांगुलीने तो स्वत: धोनीशी चर्चा करेल असे देखील म्हटले आहे. गांगुली म्हणाला, ‘आपल्याला धोनीचा काय विचार आहे हे देखील पाहावे लागेल. त्याला काय करायचे आहे आणि काय करायचे नाही याबद्दल मी सुद्धा त्याच्याशी बोलेल.’
‘मी सध्या त्या भूमिकेत नसल्याने मला त्याबद्दल स्पष्टता नाही. पण आता त्या पदावर असणार आहे, तेव्हा मी याबद्दल समजून घेईल आणि त्यानुसार कसे पुढे जायचे त्याचा निर्णय घेईल.’
तसेच अध्यक्षपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर तो निवड समिती आणि कर्णधाराशी चर्चा करेल असेही स्पष्ट करताना गांगुली म्हणाला, ‘यादरम्यान मी कोणत्याही भूमिकेत नव्हतो. पण आता माझी निवड समितीबरोबर पहिली बैठक 24 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे मी निवड समितीशी आणि कर्णधाराशी चर्चा करेल.’
धोनीच्या निवृत्तीबद्दल मागील अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. याबद्दल अनेकांनी विविध मते मांडली आहेत. धोनीने त्याचा शेवटचा सामना 2019 विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे.