भारताने 29 जून 2024 ला इतिहास रचत तब्बल 17 वर्षांनंतर टी20 विश्वचषक जिंकला. दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरल्यानंतर भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. विश्वविजयाचा जल्लोष साजरा करताना अवघ्या भारताला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनने याबाबत मोठा खुलासा करताना म्हटले, माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे आनंदाने ओरडणे आणि रडणे, हा क्षण त्याच्या कायम आठवणींमध्ये राहील.
2024 टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने गमावलेला सामना जवळपास जिंकला होता. विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या 24 चेंडूत केवळ 24 धावा करायच्या होत्या. येथून भारताने अशक्य ते शक्य करून दाखवले.
या स्वप्नवत क्षणाची आठवण सांगताना अश्विनने सांगितले की, 51 वर्षीय द्रविडसाठी हा एक खास क्षण होता. द्रविड एक खेळाडू म्हणून आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) विजेतेपद जिंकू शकला नव्हता, परंतु शेवटी प्रशिक्षक म्हणून तो आयसीसी स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरला. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “माझ्यासाठी सर्वात आश्चर्यकारक क्षण म्हणजे जेव्हा विराट कोहली राहुल द्रविड यांना बोलावतो आणि त्यांना कप (ट्रॉफी) देतो. मी त्यांना कपला मिठी मारून रडताना पाहिले. राहुल द्रविड ओरडत होते आणि रडत होते. मी त्यांना पहिल्यांदाच जल्लोष करताना पाहिले.”
अश्विनने भारतीय प्रशिक्षक म्हणून द्रविड यांच्या मेहनतीची कबुली दिली आणि सांगितले की त्यांनी संघात संतुलन आणले आणि खेळाडूंचा दृष्टिकोन बदलला. तो म्हणाला, “गेल्या दोन-तीन वर्षांपासून द्रविड या संघासोबत काय करत आहेत, हे मला माहीत आहे. ते किती संतुलित आहेत हे मला माहीत आहे. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली आहे हे मला माहीत आहे. मला माहित आहे की त्यांनी आपल्या प्रत्येक खेळाडूला काय दिले आहे. इतकेच नव्हे तर, ते घरी असताना सुद्धा संघासोबत हे कसे करायचे, तेकसे करायचे याचे नियोजन करत असायचे.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या तुलतेत किती पुढे चीन-अमेरिका? ऑलिम्पिकमध्ये किती सुवर्ण पदक जिंकले? जाणून घ्या टॉप 5 देश
भारतीय कर्णधारानं सांगितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अविस्मरणीय क्षण…!!!
फेडरर-नदालच्या मक्तेदारीला आव्हान देणाऱ्या दिग्गजाचा टेनिसला अलविदा! सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट