भारतीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि द वॉल राहुल द्रविड यांचे योगदान बरेच मोठे आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. ज्यांची आठवण आजही जहगभरातील चाहते आवर्जून काढतात. अनेकदा त्यांनी केलेल्या खेळींची उदाहरणे देखील दिली जातात. असाच एक सामना सचिन आणि द्रविड यांनी मिळून गाजवला होता. त्यांनी त्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना नुसते सळो की पळो करुन सोडले होते. तो सामना म्हणजे 8 नोव्हेंबर 1999 ला झालेला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना.
हा सामना हैदराबादमध्ये लाल बहादुर शास्त्री स्टेडियममध्ये झाला होता. त्यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताने दुसऱ्याच षटकात सौरव गांगुलीची 4 धावांवर विकेट गमावली. पण त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांची खरी परिक्षा सुरु झाली. कारण सचिन आणि द्रविड यांची जोडी मैदानावर होती.
सचिनने आक्रमक खेळताना अर्धशतक केले. त्यावेळी द्रविडने त्याला चांगली साथ दिली. भारतीय संघाचा डाव हे दोघे संयमाने पुढे नेत होते. पुढे सचिनने त्याच्या कारकिर्दीतील 24 वे शतक पूर्ण केले. त्याला द्रविडचीही भक्कम साथ मिळाली. बघता बघता त्यांनी त्रिशतकी भागीदारी रचली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर या दोघांना रोखण्याचे आव्हान होते. कारण काही केल्या हे दोघेही विकेट गमवण्यास तयार नव्हते. अखेर 48 व्या षटकात ख्रिस क्रेनने द्रविडला स्टिफन फ्लेमिंग करवी झेलबाद केले. पण तोपर्यंत सचिन-द्रविडने भारताला भक्कम स्थितीत उभे केले होते.
द्रविड बाद झाला तेव्हा त्याची आणि सचिनची दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 331 धावांची भागीदारी झाली होती. ही भागीदारी त्यावेळी विश्वविक्रमी भागीदारी ठरली. त्यावेळी कोणत्याही विकेटसाठी वनडेत केलेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली. त्यामुळे सचिन आणि द्रविडने इतिहास रचला होता.
द्रविडने 153 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांसह 153 धावा केल्या होत्या. तर सचिनने नाबाद राहात 150 चेंडूत नाबाद 186 धावा केल्या. यात त्याच्या 20 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने 376 धावांचा डोंगर उभा केला होता.
💥 186* off 150 – Sachin Tendulkar
🏏 153 off 153 – Rahul Dravid
🤝 Partnership of 331#OnThisDay in 1999, two titans joined forces for the biggest ODI partnership at the time!The assault against New Zealand powered India to 376/2 – the then second-highest men's ODI total 🤯 pic.twitter.com/4o3H3Ckqjx
— ICC (@ICC) November 8, 2020
त्यानंतर न्यूझीलंडला 377 धावांचा पाठलाग करताना केवळ 202 धावाच करता आल्या. न्यूझीलंडचा संघ 34 षटकांच्या आतच सर्वबाद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना व्यंकटेश प्रसाद आणि अनिल कुंबळेने प्रत्येकी 2 विकेट्स, तर निखिल चोप्रा, जवागल श्रीनाथ आणि विजय भारद्वाजने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
हा सामना जिंकून भारताने 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. हा सामना नेहमीच सचिन आणि द्रविडच्या ऐतिहासिक भागीदारीमुळे चाहत्यांच्या लक्षात राहातो.
या भागीदारीचा विक्रम पुढे जाऊन ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युएल्सने 2015 च्या विश्वचषकात 372 धावांची भागीदारी करत मोडला. तसेच 2019 मध्ये जॉन कॅम्पबेल आणि शाय होपनेही 365 धावांची भागीदारी करत सचिन आणि द्रविडच्या भागीदारीला मागे टाकले.
महत्त्वाच्या बातम्या –
“आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले पण…” नबीने व्यक्त केली खंत
सातत्यपूर्ण बाबर! विश्वचषकात लगावले चौथे अर्धशतक; नावे केले आणखी विक्रम
“द्रविड प्रशिक्षक बनला तरी टीम इंडियात बदल होणार नाही”