मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. यातील अनेक विक्रम एखाद्या क्रिकेटपटूला तोडणेही महाकठीण आहे. त्यातीलच एक विक्रम म्हणजे कसोटीत ५१ शतकांचा विश्वविक्रम. हा विक्रम सचिनने १० वर्षांपूर्वी केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना केला होता.
आठवण सचिनच्या ५१ व्या कसोटी शतकाची –
भारतीय संघ २०१०-११ ला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. या दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना केपटाऊन येथे २ ते ६ जानेवारी २०११ या दरम्यान होणार होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात जॅक कॅलिसच्या १६१ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर सर्वबाद ३६२ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने सेहवाग आणि राहुल द्रविडची विकेट लवकर गमावली. त्यामुळे सचिन दुसऱ्या दिवशी २ बाद २८ अशी संघाची अवस्था असताना फलंदाजीसाठी उतरला.
त्याने १६ व्या षटकात डेल स्टेनविरुद्ध पहिला चौकार वसूल केला. यानंतर सचिनने स्टेन, मॉर्ने मॉर्केल, लोनवाबो सोत्सोबे, पॉल हॅरिस अशा गोलंदाजांविरुद्ध काही शानदार फटके मारले. तो दुसऱ्या दिवसाखेर ४९ धावांवर नाबाद होता. त्यामुळे प्रत्येकालाच सचिनच्या शतकाची आस तिसऱ्या दिवशी होती. सचिनही चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने याच कसोटी मालिकेत आधी ५० वे शतक केले होते.
अखेर ४ जानेवारी २०११ ला सामन्याच्या तिसऱ्या दिवशी डावातील ८४ व्या षटकात तो क्षण आला. सचिनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ५१ वे आणि अखेरचे शतक पूर्ण केले. त्याने मॉर्केलविरुद्ध षटकार ठोकत शतक पूर्ण केले आणि नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या कर्णधार एमएस धोनीला मिठी मारली.
शतक पूर्ण झाल्यानंतर सचिन आणखी खुलून खेळू लागला. पण अखेर ११४ व्या षटकात १४६ धावांवर तो खेळत असताना मॉर्केलने त्याला त्रिफळाचीत करत विकेट घेतली. पण सचिनच्या या शतकामुळे भारताला पहिल्या डावात ३६४ धावा करता आल्या. पुढे हा सामना अनिर्णीत राहिला. पण हा सामना नेहमीच सचिनच्या ५१ व्या कसोटी शतकासाठी लक्षात राहिला. या सामन्यानंतर सचिनला पुढे २ वर्षे कसोटीत शतक करता आले नाही. त्याने नंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
आजही सचिनचा ५१ कसोटी शतकांचा विश्वविक्रम अबाधित आहे. त्याने वनडेतही ४९ शतकं केली आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं करणारा एकमेव क्रिकेटपटू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्मासाठी कुणाला मिळणार टीम इंडियातून डच्चू? ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला लागली उत्सुकता
‘या’ पाकिस्तानी गोलंदाजापुढे डिविलियर्सला यायचं रडू, शोएब अख्तरचा मोठा दावा






