क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यामध्ये कधी काय होईल हे कोणीही आधीच सांगू शकत नाही. यामुळे याला अनिश्चिततेचा खेळ देखील म्हटले जाते. त्यामुळे काही वेळेस क्रिकेटमध्ये आपणाला अजब आणि अद्भुत प्रकार पाहायला मिळतात. कधी कोणता सामना, कोणत्या संघाकडे वळेल किंवा कोणता संघ सामना जिंकेल? हे सामना संपल्यावरच कळून येते.
मात्र, असे ही काही सामने आहेत, जे सामन्यादरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयामुळे चर्चेचा विषय ठरतात. असेच काहीसे घडले होते इंग्लंडच्या क्रिकेट काउंटीमध्ये. या सामन्यात घडले असे होते की, काउंटीचा संघ सर्रेचा कर्णधार स्टुअर्ट सुरिजने ९२ धावांवर डाव घोषित केला होता. विशेष म्हणजे, ९२ धावांवर डावाची घोषणा करुनही सर्रेने हा सामना एक डाव आणि २७ धावांनी जिंकला देखील.
हा अद्भुत सामना आजच्याच दिवशी ६७ वर्षांपूर्वी म्हणजे २६ ऑगस्ट १९५४ ला झाला होता. हा सामना सुरे आणि वोर्सेस्टरशर या संघांमध्ये केनिंग्टन ओवलच्या मैदानावर झाला होता. हा सामना २५ ते २६ ऑगस्ट या दरम्यान खेळविण्यात आला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना वोर्सेस्टरशरच्या पूर्ण संघाने केवळ २५ धावा केल्या होत्या. यातील कित्येक खेळाडूंना १० धावा देखील करता आल्या न्हवत्या. तसेच ५ फलंदाज तर भोपळाही न फोडता तंबूत परतले होते. सर्रेकडून गोलंदाजी करताना टोनी लॉकने ५ विकेट घेतल्या होत्या. विशेष म्हणजे २५ धावा करण्यासाठी वोर्सेस्टरशरने तब्बल २९ षटक खेळले होते.
ज्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सर्रेच्या संघाने ३ विकेट्सच्या बदल्यात ९२ धावा केल्या होत्या. मात्र, एवढ्यावरच सर्रेचा कर्णधार स्टुअर्ट सुरिजने डाव घोषित करण्याचा एकदम धाडसी निर्णय घेतला. त्यावेळी चाहत्यांनी स्टुअर्टच्या या निर्णयावर खूप आश्चर्य व्यक्त केले होते.
यानंतर वोर्सेस्टरशर संघ पुन्हा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला. दुसऱ्या डावातही वोर्सेस्टरशरचा संघ ४३ षटक खेळल्यानंतर केवळ ४० च्या धावांवर सर्वबाद झाला होता आणि अशा पद्धतीने सर्रेने हा अद्भुत आणि आश्चर्यकारक सामना एक डाव आणि २७ धावांनी आपल्या खिशात घातला व काउंटी स्पर्धेतील आपले तिसरे जेतेपद पटकावले. त्यामुळे सर्रेचा कर्णधार स्टुअर्ट सुरिजचा हा धाडसी निर्णय आजही कौतुकास पात्र ठरतो.
हेही वाचा-
फलंदाजीमध्ये ९९.९४ची जबरदस्त सरासरी असलेल्या ब्रॅडमन यांना ‘या’ गोलंदाजानी दिला सर्वाधिक त्रास