क्रिकेट इतिहासात एक दुर्दैवी घटना घडली होती. ती घटना जरी आठवली, तरीही अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. ती घटना १३ वर्षांपूर्वी म्हणजेच ३ मार्च, २००९ रोजी पाकिस्तानात घडली होती. पाकिस्तानच्या लाहोर येथे घडलेल्या या घटनेने संपर्ण क्रिकेट विश्व हादरले होते. याच दिवशी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला होता.
या भीषण हल्ल्याने संपूर्ण क्रीडा जगत हादरले होते. तसेच या घटनेचे पडसाद बराच काळ उमटत होते. या हल्ल्यामुळे कित्येक वर्ष पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने देखील स्थगित झाले होते. या हल्ल्याला आता १३ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्त्ताने या लेखात आपण या भयावह घटनेचा आढावा घेऊया.
मैदानावर जात असताना झाला हल्ला
पाहुणा श्रीलंकेचा संघ लाहोरच्या मैदानावर सामना खेळण्यासाठी बसमधून निघाला होता. त्यावेळी मैदानाजवळच्या एका चौकात दहशतवाद्यांनी बस हेरून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हे दहशतवादी दोन गाड्यांमधून आले होते. गाड्या थांबवून त्यातून उतरून त्यांनी गोळीबार सुरू केला होता. त्यांनी रॉकेट आणि हँड ग्रेनेडने देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
कसे वाचले खेळाडू?
दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करताच सगळे खेळाडू बसमध्ये आपापल्या सीटखाली झुकले. दहशतवाद्यांच्या गोळ्या बसच्या काचा फोडून आत घुसत होत्या. मात्र, श्रीलंकन संघाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा पथकांनी प्रत्युतर द्यायला सुरुवात केली आणि खेळाडूंची बस मैदानात पोहोचवली. काही खेळाडू जखमी झाले. मात्र, या भयावह हल्ल्यात सुदैवाने कोणत्याही खेळाडूचा जीव गेला नाही, पण सुरक्षा पथकातील काही जणांना मात्र आपल्या प्राणाला मुकावे लागले. या घटनेनंतर लगेचच सामना रद्द करण्यात आला.
काही खेळाडू झाले गंभीर जखमी
रिपोर्टनुसार या हल्ल्यात बसवर सुमारे ३५ गोळ्यांचे निशाण सापडले होते. अनेक गोळ्या काचा फोडून आत शिरल्या होत्या. एक गोळी महेला जयवर्धनेच्या अगदी जवळून गेली होती, तर कुमार संगकाराच्या खांद्यालाही एक गोळी चाटून गेली होती. मात्र, थरंगा परनविथाना हा खेळाडू सर्वाधिक गंभीर जखमी झाला होता. त्याच्या छातीत गोळी लागली होती. थिलन समरवीराच्याही पायाला गोळी लागली होती.
दौरा तातडीने झाला रद्द
या हल्ल्याने संपूर्ण विश्वात खळबळ उडाली होती. श्रीलंकन संघाने या हल्ल्यानंतर लगेचच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकन खेळाडूंना घेऊन जाणारी बस मैदानात पोहोचल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी पुढे तिथे हेलिकॉप्टर बोलावण्यात आले होते. जिथून खेळाडूंना थेट विमानतळावर घेऊन जाण्यात आले होते. श्रीलंकेचा दौरा तर तातडीने स्थगित करण्यात आलाच होता. मात्र, या भयावह घटनेनंतर अनेक वर्षे कुठल्याही संघाने पाकिस्तानचा दौरा करणे टाळले होते.
मागील एक-दोन वर्षांत काही संघांनी पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे. मात्र, अजूनही संघांचे प्रमुख खेळाडू पाकिस्तान दौऱ्यात सहभागी होण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे हा हल्ला पाकिस्तान क्रिकेटला अजूनही महागात पडतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना संक्रमित राउफच्या जागी ‘या’ हॅट्रिकवीराची पाकिस्तानच्या कसोटी संघात वर्णी, करणार पुनरागमन