5 एप्रिल हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे. 33 वर्षांपूर्वी म्हणजेच 1991 साली आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ या जुळ्या भावंडांनी पहिल्यांदा एकत्र कसोटी क्रिकेट खेळलं होतं. हा कसोटी सामना वेस्ट इंडिजच्या ‘पोर्ट ऑफ स्पेन’ येथे खेळला गेला होता. स्टीव्ह आणि मार्क वॉ यांनी 108 कसोटी सामने एकत्र खेळले आहेत. याशिवाय त्यांनी एकत्र 214 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलंय.
2 जून 1965 रोजी जन्मलेल्या स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ यांच्या वयात फक्त चार मिनिटांचा फरक आहे. स्टीव्हनं डिसेंबर 1985 मध्ये भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होतं. तर लहान भाऊ मार्कला पाच वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, जानेवारी 1991 मध्ये भाऊ स्टीव्हच्या जागी मार्कची कसोटी संघात निवड झाली होती. मार्कनं पहिल्याच सामन्यात शतक झळकावून शानदार पदार्पण केलं. ॲशेस मालिकेदरम्यान, मार्कनं ॲडलेडच्या मैदानावर 138 धावांची इनिंग खेळून संघात आपलं स्थान पक्कं केलं. अवघ्या तीन महिन्यांनंतर स्टीव्ह वॉचंही कसोटी संघात पुनरागमन झालं. हे दोघे 5 एप्रिल 1991 रोजी पहिल्यांदा एकत्र खेळले.
स्टीव्ह वॉची कसोटी संघात निवड झाल्यानंतर मार्क वॉनंही आपल्या खेळात सुधारणा करण्यास सुरुवात केली होती. एके दिवशी स्टीव्ह आणि मार्कचे पालक आपापसात बोलत होते, “मार्क आता चांगला खेळू लागला आहे. माहित नाही तो दिवस कधी येईल जेव्हा मार्क देखील आपल्या देशासाठी कसोटी खेळेल. तेवढ्यात स्टीव्ह आत आला. त्यानी हे शब्द ऐकले होते. तो हसत म्हणाला, ‘तुम्ही जे सांगितलं ते खरं ठरलंय. पुढील ॲशेस कसोटीसाठी मार्कची निवड झाली आहे.”
यावर स्टीव्ह वॉच्या आईनं त्याला विचारलं, “मार्कला संघामध्ये कोणाच्या जागी संधी मिळाली? ज्यावर स्टीव्हनं सहज उत्तर दिलं, ‘माझ्या जागी!’ यानंतर स्टीव्हचे आई-वडील त्याच्याकडे बघतच राहिले. मार्क वॉ ताबडतोब स्टीव्हला मिठी मारून म्हणाला – माझी इच्छा आहे प्रत्येकाला तुझ्यासारखा भाऊ असावा!
स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ हे कसोटी क्रिकेट खेळणारे पहिले जुळे खेळाडू होते. त्यानंतर न्यूझीलंडचे जुळे हमिश मार्शल आणि जेम्स मार्शल यांनीही एकत्र कसोटी क्रिकेट खेळलं. हामिश आणि जेम्स मार्च 2005 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत एकत्र मैदानात उतरले होते. 1987 साली ऑस्ट्रेलियानं अॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्या संघात स्टीव्ह वॉचा संघात समावेश होता. 1999 मध्ये ऑस्ट्रेलियानं दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला, तेव्हा हे दोन्ही बंधू संघात होते. स्टीव्ह वॉ विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता.
दोघांची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी
स्टीव्ह वॉ – 168 कसोटी, 260 डाव, 10927 धावा, 200 सर्वोत्तम धावसंख्या, 51.06 सरासरी, 32 शतकं आणि 50 अर्धशतकं.
मार्क वॉ – 128 कसोटी, 209 डाव, 8029 धावा, 153* सर्वोत्तम धावसंख्या, 41.81 सरासरी, 20 शतकं आणि 47 अर्धशतकं.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे आशुतोष शर्मा? पठ्ठ्यानं केवळ 11 चेंडूत ठोकलंय अर्धशतक! जाणून घ्या
हैदराबादविरुद्ध ‘थाला’ धारण करतो रौद्र रूप! आकडेवारी भयंकर….पॅट कमिन्सच्या संघाला घ्यावी लागेल काळजी