आयपीएल 2024 च्या 17 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचे संघ आमनेसामने होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाबनं गुजरातवर 3 गडी राखून रोमांचक विजय मिळवला. संघाच्या या विजयात महत्वाचं योगदान होतं ते आशुतोष शर्मा या युवा अनकॅप्ड खेळाडूंचं.
आशुतोषनं गुजरातविरुद्ध 17 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 31 धावांची शानदार खेळी केली. पंजाबला जेव्हा सर्वाधिक आवश्यकता होती तेव्हा आशुतोषनं ही झंझावाती खेळी खेळली. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आशुतोषनं अशी कामगिरी प्रथमच केलेली नाही. त्यानं याआधी चक्क 11 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा पराक्रमही केला आहे! असा हा आशुतोष शर्मा आहे तरी कोण? चला जाणून घेऊया.
आशुतोष शर्मा यांचा जन्म 15 सप्टेंबर 1998 रोजी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला. तो रेल्वेकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. मात्र तो पूर्वी मध्य प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशुतोष शर्माला 2020 मध्ये मध्य प्रदेश संघ सोडावा लागला होता. चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशचे प्रशिक्षक झाल्यानंतर त्यांनी आशुतोषला राज्याच्या संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर आशुतोष रेल्वे संघात सामील झाला. भारताचा माजी क्रिकेटपटू नमन ओझानं त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत केल्याचं सांगितलं जातं. आशुतोष लहानपणी नमनचा चाहता होता. नमन ओझा हा देखील मध्य प्रदेशचा आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आशुतोषनं 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला होता. स्पर्धेतील ‘क’ गटातील सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध आशुतोषनं 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा 16 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला होता. युवराज सिंगनं 2007 च्या टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
हैदराबादविरुद्ध ‘थाला’ धारण करतो रौद्र रूप! आकडेवारी भयंकर….पॅट कमिन्सच्या संघाला घ्यावी लागेल काळजी