भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला जगभरातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. त्याच्या मैदानावरील झंझावाती प्रदर्शनामुळे त्याला रनमशीन अशी उपाधी देण्यात आली आहे. परंतु गेल्या २ वर्षांपासून याच विराटची बॅट शांत राहिली आहे. आज (२३ नोव्हेंबर) त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटच्या शतकाला २ वर्षे पूर्ण झाली आहेत.
ती वेळ होती, २०१९ सालची. पहिल्या गुलाबी चेंडू कसोटी सामन्यात भारतापुढे बांगलादेश संघाचे आव्हान होते. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवरील या सामन्यात विराटने तब्बल १३६ धावा फटकावल्या होत्या.
ऐतिहासिक कसोटीत भारताचा शानदार विजय
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ केवळ १०६ धावांवर सर्वबाद झाला होता. भारतीय गोलंदाज ईशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांच्या भेदकतेपुढे बांगलादेश संघाने नांग्या टाकल्या होत्या. गोलंदाजांच्या दमदार सुरुवातीनंतर फलंदाजी करताना विराटने कर्णधार खेळी खेळली होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने १९४ चेंडूंचा सामना करताना १३६ धावांची प्रशंसनीय खेळी केली होती. आपल्या या खेळीदरम्यान त्याने १८ चौकार ठोकले होते.
विराटव्यतिरिक्त केवळ अजिंक्य रहाणेला या डावात अर्धशतकी धावा करता आल्या होत्या. इतर भारतीय फलंदाज धावांची साधी पन्नाशीही गाठू शकले नव्हते. परंतु विराटचे हे शतकच आख्ख्या बांगलादेश संघाला पुरून उरले आणि भारताने १ डाव व ४६ धावांनी हा सामना खिशात घातला होता.
विराटने आपल्या शतकासह या सामन्याला चार चाँद तर लावलेच होते. परंतु या सामन्याला अजूनच खास बनवण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने भारताच्या बऱ्याचशा माजी कर्णधारांना पाहुणे म्हणून बोलावले होते. त्यामुळे या सामन्याची आणि विराटच्या शतकाची शोभा अजूनच वाढली होती. विशेष म्हणजे, हा सामना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचा भाग होता.
अजूनही शतकासाठी तरसतोय विराट
परंतु या शतकानंतर विराटला अद्यापही सूर गवसला नसल्याचे दिसते आहे. त्याची एका-नंतर-एक शतके झळकावण्याची कामगिरी पाहता, विराट लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा १०० शतकांचा विश्वविक्रम मोडित काढेल असे म्हटले जात होते. परंतु गेल्या २ वर्षांतील त्याचे प्रदर्शन पाहता ही कामगिरी साध्य करणे त्याच्यासाठी अवघड बनल्याचे दिसते आहे. विराटचे वय सध्या ३३ वर्षे झाले आहे आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७० शतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
क्लार्कने ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी सुचवले ‘हे’ नाव
मुश्ताक अली ट्रॉफी गाजवणाऱ्या ‘या’ पाच जणांवर आयपीएलमध्ये लागू शकते कोट्यावधींची बोली
गुजरात टू टीम इंडिया व्हाया हरियाणा; हर्षल पटेलचा रोमांचक प्रवास