भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे.त्याने आतपर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने वनडे, टी -२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. विराटने १८ ऑगस्ट रोजी आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली होती.
भारतीय १९ वर्षांखालील संघाला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर विराट कोहली चर्चेत आला होता. त्यानंतर त्याची कामगिरी पाहून त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली होती. त्याने १८ ऑगस्ट २००८ रोजी भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. आपल्या कारकिर्दीतील पहिला वनडे सामना त्याने श्रीलंका संघाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात तो २२ चेंडूंमध्ये १२ धावा करत माघारी परतला होता. या सामन्यातील ८ व्या षटकात नुवान कुलशेखराने त्याला बाद करत माघारी धाडले होते.
आपल्या पहिल्याच सामन्यात तो फ्लॉप ठरला असला तरी देखील त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक दिग्गजांना मागे टाकत, मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
विराट कोहलीने जेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तेव्हापासून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तसेच शतक आणि अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत देखील तो सर्वात पुढे आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक दुहेरी शतक आणि सामनावीर, मालिकावीर पुरस्कार पटकावण्याचा विक्रम देखील विराट कोहलीच्या नावावर आहे.
वनडेमध्ये २०० डावांच्या नंतर सर्वाधिक शतक
वनडे क्रिकेटचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटच्या नावे पहिल्या २०० डावांत सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम आहे. त्याने २०० डावांत ३५ शतक झळकावले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आम्लाने १७८ डावांनंतर २७ शतक झळकावले होते. तर एबी डिविलियर्सने २४, रोहित शर्माने २२, सचिन तेंडुलकरने २१ आणि रॉस टेलरने २० शतक झळकावले होते.
विराट कोहलीची कारकीर्द
विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीत एकूण ९४ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५१.४ च्या सरासरीने ७६०९ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २७ शतकं तर २५ अर्धशतकं झळकावले आहेत. तसेच २५४ वनडे सामन्यात त्याने,५९.१ च्या सरासरीने १२१६९ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ४३ शतक आणि ६२ अर्धशतक झळकावले आहेत. तर ९० टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ५२.६ च्या सरासरीने ३१५९ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २८ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
२१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रंगलेला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना






