जवळपास ५० वर्षांपासून वनडे क्रिकेट सुरु आहे. आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी शानदार कामगिरी केली आहे. क्रिकेट म्हटलं की बऱ्याचदा एखाद्या खेळाडूची कामगिरी ही किती उत्कृष्ट हे नेहमी त्याने किती धावा केल्या आणि किती विकेट्स घेतल्या यावरुन ठरवली जाते. पण बऱ्याचदा असे काही गोलंदाज असतात जे एखादवेळी जास्त विकेट्स घेण्याच अपयशी ठरतात तरीही त्यांनी गोलंदाजी करताना फलंदाजांना जास्त धावा न दिल्याने त्यांची कामगिरी सामन्यात उत्तम ठरते. या लेखातही आज अशा ५ गोलंदाजांबद्दल जाणून घेऊ ज्यांनी वनडेमध्ये एका सामन्यात विकेट न घेताही सर्वात कमी धावा दिल्या आहेत. (या लेखात ज्या ५ गोलंदाजांचा आढावा घेतला आहे त्यांना एका वनडेत ७ किंवा त्याहून अधिक षटके गोलंदाजी केली आहे.)
५. जोएल गार्नर (१०-२-१७-०)
१९८०/८१ च्या काळात वेस्ट इंडीज संघ इंग्लंड दौर्यावर असताना दोन वनडे मालिकेतील हा पहिला सामना होता. इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर वेस्ट इंडीज संघ केवळ १२७ धावा (४७.२ षटकांत) करून सर्वबाद झाला. त्या डावात फक्त सलामीवीर डेसमॉन्ड हेन्स (३४) आणि एव्हर्टन मॅटिस (६२) हे दुहेरी आकडा गाठू शकले.
प्रत्युत्तरादाखल इंग्लंड फक्त १२५ (४८.२ षटकांत) करून सर्वबाद झाला आणि वेस्ट इंडीजने हा सामना केवळ दोन धावांनी जिंकला. कोलीन क्रॉफ्ट (६/१५) त्या सामन्याचा हिरो ठरला. परंतु डावखुरा वेगवान गोलंदाज जोएल गार्नरने एकही विकेट न घेताही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्या सामन्यातील गार्नरची गोलंदाजी १०-२-१७-० अशी होती. त्याने फक्त १.७० च्या इकॉनॉमी रेटने १० षटकात केवळ १७ धावा दिल्या होत्या.
४. जॉन ट्राकोस (१०-४-१६-०)
१९९२ च्या क्रिकेट विश्वचषकातील ३५ वा सामना होता. इंग्लंडने झिम्बाब्वेच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाठवल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ अवघ्या १३४ धावा (४६.१ षटकांत) करून बाद झाला. झिम्बाब्वे कडून फक्त कर्णधार डेव्ह हूटन (२९) आणि इयान बुचार्ट (२४) यांनीच २० धावांचा टप्पा ओलांडला. इंग्लंडचे गोलंदाज इयान बोथम (३/२३) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (३/३३) यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज एडडो ब्रँडच्या घातक गोलंदाजीमुळे इंग्लंड संघाला फक्त १२५ धावा (४९.१ षटकांत) करता आल्या. ऑफ स्पिनर जॉन ट्राकोसनेदेखील त्या सामान्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती, कारण त्यानी १.६० च्या इकॉनॉमी रेटने १० षटकात केवळ १६ धावा दिल्या. यावेळी त्याने एकही विकेट घेतली नव्हती.
३. वसीम अक्रम (७-१-११-०)
१९९७ मधील सिंगर-अकाई चषक वनडे तिरंगी मालिकेतील लीग टप्प्यातील हा झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना होता. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ५० षटकांत केवळ १५१/९ धावा केल्या. त्या डावात फक्त यष्टीरक्षक-फलंदाज मोईन खान (६१) आणि सक्लेन मुश्ताक (२०) यांनी दोनअंकी धावा केल्या. दरम्यान, त्या डावात हीथ स्ट्रीकने (४/१८) चार गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वे फक्त ११९ धावांवर सर्वबाद झाला आणि पाकिस्तानने तो सामना ३२ धावांनी जिंकला. पाकिस्तानकडून मुश्ताक अहमद (४/२७), वकार युनूस (३/१४) आणि सक्लेन मुश्ताक (२/३७) यांनी विकेट्स घेतल्या तर वसीम अक्रमने विकेट घेतली नसली तरी शानदार गोलंदाजी केली. त्याने १.५७ च्या इकॉनॉमी रेटसह ७ षटकात ११ धावा दिल्या.
२. सक्लेन मुश्ताक (८-२-१२-०)
२००० मध्ये कार्ल्टन-युनायटेड वनडे तिरंगी मालिकेचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ सुरुवातीपासूनच झुंज देत खेळत होता. पाकिस्तान संघातील मधल्या फळीतील फलंदाजांनी तळातल्या फलंदाजांच्या मदतीने ५० षटकांत १८४ धावा केल्या.
सक्लेन मुश्ताकने नाबाद ३७ धावा केल्या तर कर्णधार वसीम अक्रम (३५), यष्टीरक्षक फलंदाज मोईन खान (३३) आणि वकार युनूस (२३) यांनीही महत्त्वपूर्ण खेळी साकारली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपैकी अँड्र्यू सायमंड्सने (३/३४) तीन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ फक्त १३९ धावांवर बाद झाला. पाकिस्तानने सामना ४५ धावांनी जिंकला. रिकी पॉन्टिंग (३२), मायकेल बेव्हन (नाबाद ३१) आणि सलामीवीर ऍडम गिलख्रिस्ट (२७) हे ऑस्ट्रेलियन फलंदाजच केवळ २० धावांचा टप्पा गाठू शकले. अब्दुल रझाक (४/२३), शोएब अख्तर (३/३१) आणि वकार युनूस (२/२५) या गोलंदाजानी विकेट्स घेतले. ऑफ स्पिनर सक्लेन मुश्ताकला विकेट मिळाली नसली तरी त्याने या सामन्यात खूपच चांगली गोलंदाजी केली. त्याने १.५ च्या इकॉनॉमी रेटने ८ षटकात १२ धावा अशी गोलंदाजी केली.
१. रिचर्ड हेडली (९-४-१२-०)
१९८८ मधील बेन्सन हेजेज वर्ल्ड सिरीजमधील श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंडचा तिसरा सामना होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर न्यूझीलंडच्या मध्यगती वेगवान गोलंदाज इव्हन चॅटफिल्ड (४/३२) यांच्या घातक गोलंदाजीपुढे श्रीलंका संघ १४४ धावा (४८.२ षटकांत) करून सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून चॅटफिल्ड व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज सर रिचर्ड हॅडली यांनीही एकही विकेट घेतली नसली तरी जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्यांनी १.३ च्या इकॉनामी रेटने ९ षटकात १२ धावा अशी गोलंदाजी केली. यात ४ षटके त्यांनी निर्धाव टाकली होती.
नंतर न्यूझीलंडने ४८.४ षटकांत चार विकेट गमावून १४५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
वाचनीय लेख –
जसप्रीत बुमराहचे ते ४ नो-बॉल, जे भारतीय संघाच्या विजयात ठरले अडसर
सर्वात कमी वयात कसोटी सामन्यातील पहिला चेंडू खेळणारे जगातील ४ क्रिकेटर
भारतीय संघाचं भविष्य अशी ओळख असलेल्या पृथ्वी शॉबद्दलची ‘ही’ हटके माहिती






