दिग्गज फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाला १९८६ फुटबॉल विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी(२५ नोव्हेंबर) रात्री वयाच्या साठाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मॅराडोना यांच्या निधनानंतर जगभरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. फुटबॉलचे सम्राट म्हणवल्या जाणाऱ्या, ब्राझीलच्या पेले यांनीदेखील ट्विटरवरून मॅराडोना यांना अनोख्या पद्धतीने ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
एक दिवस आकाशात फुटबॉल खेळू
ब्राझीलला तीन फुटबॉल विश्वचषक जिंकून देणाऱ्या पेले यांनी मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले, “ही खूपच वाईट बातमी आहे. मी एक चांगला मित्र आणि जगाने एक दिग्गज फुटबॉलपटू गमावला आहे. यावेळी खूप काही बोलू वाटतेय. मात्र, मी तूर्तास इतकेच म्हणेल की, त्याच्या परिवाराला व चाहत्यांना ईश्वर शक्ती देवो. आपण एक दिवस आकाशात एकत्र फुटबॉल खेळू.”
Que notícia triste. Eu perdi um grande amigo e o mundo perdeu uma lenda. Ainda há muito a ser dito, mas por agora, que Deus dê força para os familiares. Um dia, eu espero que possamos jogar bola juntos no céu. pic.twitter.com/6Li76HTikA
— Pelé (@Pele) November 25, 2020
मॅराडोना आणि पेले यांच्यात होती घट्ट मैत्री
पेले आणि मॅराडोना यांच्या वयात जवळपास वीस वर्षांचे अंतर असतानाही, ते दोघे एकमेकांचे मित्र होते. पेले यांच्यानंतर मॅराडोना यांनाच फुटबॉलर म्हणून सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली होती. ते दोघे एकामेकाच्या खेळाचा व कौशल्यांचा आदर करत. मॅराडोना यांनी सुरु केलेल्या टेलिव्हिजन शोमध्ये पहिल्या भागाचे प्रमुख पाहुणे म्हणून पेले यांना निमंत्रित केले होते.
भारतीय पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
मॅराडोना यांच्या निधनानंतर जगभरातील विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिग्गज बॉक्सर माईक टायसन, फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो, डेविड बेकहॅम यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली, भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटकरुन मॅराडोना यांना श्रद्धांजली अर्पण केली.
वाचा –
‘माझा हिरो जगातून निघून गेला’, मॅराडोनाच्या निधनानंतर सौरव गांगुलीचे भावुक ट्वीट
“दिएगो मॅराडोना फुटबॉलचे उस्ताद”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्याबद्दलच्या १२ रंजक गोष्टी, वाचा