---Advertisement---

आयपीएल २०२१: सामन्याचा नूर पालटू शकणारा प्रत्येक संघातील एक विदेशी खेळाडू

---Advertisement---

आयपीएल २०२१ सुरू होण्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत. आयपीएलच्या प्रत्येक मोसमात काही परदेशी खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. प्रत्येक संघांचे मालक त्यांची निवड करताना बराच विचार करतात. कारण त्यापैकी एकाही खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी बजावली तर तो विजय आणि पराभव यातील फरक ठरू शकतो.

आयपीएलच्या मागील मोसमात बर्‍याच खेळाडूंनी आपल्या स्फोटक फटकेबाजीने व प्रभावी गोलंदाजीने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बरेच विदेशी खेळाडू आपापल्या संघासाठी मोठी भूमिका निभावतील.

आज आपण प्रत्येक संघाच्या प्रत्येकी एका विदेशी ‘मॅचविनर’ खेळाडूविषयी जाणून घेऊया.

१) एबी डिव्हिलियर्स- आरसीबी
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सर्वात महत्त्वपूर्ण विदेशी खेळाडू म्हणून एबी डिव्हिलियर्सकडे पाहिले जाते. २०११ पासून तो आरसीबीचा भाग आहे. आरसीबीने आतापर्यंत मिळवलेल्या सर्व संस्मरणीय विजयात त्याचा नेहमीच वाटा राहिला आहे.

आरसीबीला आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावायचे असेल तर, डिव्हिलियर्सला आपल्या आत्तापर्यंतच्या दैदीप्यमान आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल.

२) राशिद खान- सनरायझर्स हैदराबाद
सध्या निर्विवादपणे टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकीपटू असलेला अफगाणिस्तानचा राशिद खान यावर्षी पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादसाठी मैदानात उतरेल. राशिद २०१७ पासून सनरायझर्स हैदराबादसाठी खेळतो. राशिद संघाचा भाग झाल्यापासून सनरायझर्सने प्रत्येक वर्षी प्ले-ऑफपर्यंत मजल मारली आहे.

किफायतशीर गोलंदाजीसोबतच तो सातत्याने बळी मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. तसेच, गरज पडल्यास सातव्या-आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सामन्याचा नूर पालटण्याची त्याची क्षमता आहे.

३) सॅम करन- चेन्नई सुपर किंग्स
मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सामील झालेला इंग्लंडचा युवा अष्टपैलू सॅम करनने पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांची मने जिंकली होती. संपूर्ण हंगामात त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने संघासाठी योगदान दिले. सीएसकेसाठी २०२० आयपीएल हंगाम लाभदायी ठरला नव्हता. मात्र, सॅम करन त्यांच्यासाठी हंगामातील सर्वात मोठी सकारात्मक बाब म्हणून पुढे आलेला.

भारताविरुद्ध नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी करून त्याने आपल्या हंगामासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. सीएसकेच्या चाहत्यांना त्याच्याकडून यावर्षी देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

४) जोस बटलर- राजस्थान रॉयल्स
इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर हा आगामी आयपीएलमध्ये राजस्थानसाठी सर्वोत्तम कामगिरी करताना दिसू शकतो. २०१८ मध्ये प्रथमता राजस्थानसाठी खेळताना त्याने एकट्याच्या जिवावर राजस्थानला प्ले ऑफपर्यत पोहचवले होते. त्यानंतरही तो सातत्याने राजस्थानसाठी उत्कृष्ट कामगिरी करत आला आहे.

यावर्षी राजस्थानला आपल्या १४ साखळी सामन्यांपैकी ७ सामने फलंदाजांना पोषक असणाऱ्या मुंबई आणि बेंगलोर येथील मैदानांवर खेळायचे आहेत. त्यामुळे, बटलरला आपला खेळ दाखवण्याची चांगली संधी असेल.

५) कागिसो रबाडा- दिल्ली कॅपिटल्स
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा सलग चौथ्या वर्षी दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना दिसेल. रबाडाने २०२० आयपीएलवेळी सर्वाधिक बळी मिळवत पर्पल कॅप आपल्या नावे केली होती. मागील वर्षी दिल्लीच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारलेली. यावर्षी दिल्लीला विजेतेपद मिळवायचे असेल तर, रबाडाला आपल्या कामगिरीत सातत्य राखावे लागेल.

६) आंद्रे रसेल- कोलकता नाइट रायडर्स
वेस्ट इंडीजचा अव्वल अष्टपैलू आंद्रे रसेल पुन्हा एकदा आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज आहे. आपल्या तुफानी फटकेबाजीने व धारदार गोलंदाजीने तो सामन्याचा नूर पालटू शकतो. रसेलने २०१८ मध्ये स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता.
रसेलने मागील आयपीएलमध्ये कारकिर्दीतील सर्वात खराब कामगिरी केली होती. २०१४ नंतर केकेआरला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवायचे असेल तर, रसेलला आपले जुने रूप दाखवावे लागेल.

७) कायरन पोलार्ड- मुंबई इंडियन्स
आयपीएलमधील सर्वात अनुभवी विदेशी खेळाडू असलेला वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू मुंबईसाठी आपला बारावा हंगाम खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत ५ आयपीएल विजेतेपदे पटकावली असून, त्या सर्वांमध्ये पोलार्डचा सिंहाचा वाटा राहिला आहे. ज्यावेळी रोहित शर्मा उपस्थित नसेल, त्यावेळी पोलार्ड संघाचे नेतृत्व देखील करतो.

सध्या वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार असलेला पोलार्ड जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील त्यांनी एकाच षटकात सलग सहा षटकार ठोकण्याचा कारनामा केला. असाच फॉर्म तो कायम राखण्याचा प्रयत्न करेल.

८) निकोलस पूरन- पंजाब किंग्स
आपले पहिलेवहिले आयपीएल विजेतेपद पटकावण्यासाठी केएल राहुलच्या नेतृत्वातील पंजाब किंग्स उत्सुक असेल. यावर्षी पंजाबला वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनकडून खूप अपेक्षा असतील. मागील हंगामात त्याने पंजाबसाठी उत्तम कामगिरी बजावली होती. पंजाबच्या मधल्या फळीत तो सर्वात अनुभवी खेळाडू आहे.

पूरन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अबुधाबी येथे संपन्न झालेल्या टी१० लीगमध्ये त्याच्याच नेतृत्वात संघाने विजेतेपद पटकावले होते. आपल्या विस्फोटक फलंदाजीचे प्रात्यक्षिक भारतातील मैदानांवर करण्यासाठी तो उत्सुक असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१ पुर्वी सीएसकेला मोठा झटका, ‘या’ ३० वर्षीय गोलंदाजाने घेतली माघार

एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच कोहली-डिव्हिलियर्स मध्ये चालू असलेल्या वादविवादात देवदत्त पडीक्कलची उडी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---