ऑस्ट्रेलियाची टीम (Austrelia Cricket team) सध्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार कामगिरी करत वेस्ट इंडिजला चारही बाजूंनी पराभूत केले. आता दुसरा कसोटी सामना ग्रेनाडाच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) असा झेल पकडला की सगळेच थक्क झाले. स्वतःच्या गोलंदाजीवर त्याने एका हाताने डाईव्ह मारत हा झेल घेतला. हा आश्चर्यकारक झेल पाहून फलंदाजालाही विश्वास बसला नाही की तो बाद झाला आहे.
32 वर्षांच्या पॅट कमिन्सने केसी कार्टीला बाद करण्यासाठी हे अद्भुत कौशल्य दाखवले. कमिन्सच्या चेंडूवर कार्टीच्या बॅटला बाहेरील किनारा लागला आणि चेंडू हवेत गेला. ते बघताना वाटत होते की, चेंडू मोकळ्या जागेत पडेल, पण कमिन्सने चपळाई दाखवून लांब डाईव्ह मारून अशक्य वाटणारा झेल पकडला. अंपायरने लगेच कार्टीला आऊट दिले, पण त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. थर्ड अंपायरचा निर्णय आल्यानंतर कार्टी माघारी परतला.
या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 286 धावा केल्या. संघासाठी सलामीवीर पुन्हा एकदा या दौऱ्यात अपयशी ठरले. अॅलेक्स कॅरी आणि वेब्स्टरने खालच्या फळीतील फलंदाज म्हणून अर्धशतके ठोकत संघाला कमी धावसंख्येतून वाचवले. वेब्स्टरने 60 धावा केल्या, तर कॅरीने 63 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवातही काही विशेष झाली नाही आणि त्यांनी फक्त 7 धावांवर पहिली विकेट गमावली.
ऑस्ट्रेलियाकडे हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची मोठी संधी आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी 159 धावांनी विजय मिळवला होता. जर हा सामना देखील ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर मालिकेत 2-0 अशी चांगली आघाडी मिळवतील.






