लंडन। सोमवारी, 2 जुलैला भारताचा टेनिसपटू युकी भांबरी विंबल्डन 2018च्या स्पर्धेतून पहिल्याच फेरीत पराभूत झाला आहे.
त्याला इटलीच्या थॉमस फॅबियानोने 2 तास 38 मिनिटे चाललेल्या लढतीत 6-2, 3-6, 3-6, 2-6 असे चार सेटमध्ये पराभूत केले. त्यामुळे त्याचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले.
हे दोघे चार वेळा आमने-सामने आले आहेत. पण चारही वेळा भांबरीला पराभव स्विकारावा लागला आहे.
भांबरी जरी विंबल्डनच्या पहिल्या फेरीत पराभूत झाला असला तरी त्याला जवळजवळ 35 लाख (39000 युरो) इतकी प्राईजमनी मिळणार आहे. या स्पर्धेत एकेरीत विजेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूला (पुरुष/महिला) 2.25 मिलियन युरो इतके स्पर्धेचे बक्षिस मिळणार आहे.
त्याचबरोबर भांबरी हा भारताकडून यावर्षी विंबल्डनमध्ये एकेरी गटात खेळणारा एकमेव टेनिसपटू होता. तसेच भारताकडून एकूण 6 टेनिसपटू विंबल्डनमध्ये दुहेरी स्पर्धेत खेळणार आहेत.
भांबरी हा यावर्षीच्या पहिल्या तीनही ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेत एकेरी गटात खेळला आहे. मात्र त्याला यात एकही सामना जिंकता आला नाही.
तो आॅस्ट्रेलिया ओपनमध्ये पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. तर त्याच्या 100 च्या आतल्या क्रमवारीमुळे तो फ्रेंच ओपन आणि विंबल्डनसाठी थेट पात्र ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–पहा विडीओ- विंबल्डन इतिहासातील हा आहे सर्वात गमतीशिर किस्सा!
–Video- या कारणामुळे फेडररला जगात चाहत्यांचे सर्वाधिक प्रेम मिळते