---Advertisement---

…म्हणून पुण्यात 32 वर्षांपूर्वी झालेला ‘तो’ सामना सचिन तेंडुलकरसाठी ठरला खास

On: सोमवार, डिसेंबर 5, 2022 10:04 AM
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या खेळी केल्या. त्यातील अनेक खेळींची आजही आठवण काढली जाते. त्याच्या अनेक खेळी अविस्मरणीय अशाच आहेत. त्यातील एक खेळी त्याने 32 वर्षांपूर्वी पुण्यात केली होती. ती खेळी आजही खास आहे.

5 डिसेंबर 1990 रोजी भारत विरुद्ध श्रीलंका संघात पुण्याच्या नेहरु स्टेडियमवर वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला होता. या सामन्यात सचिनने अष्टपैलू कामगिरी केली होती. तसेच याच सामन्यात सचिनने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले होते.

पदार्पणाच्या १ वर्षानंतर सचिनचे पहिले अर्धशतक 
सचिनने 18 डिसेंबर 1998 ला पाकिस्तानविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्यानंतर सचिनला जवळपास एक वर्ष ५० धावांचा आकडा एकदाही पार करता आला नव्हता. पण ५ डिसेंबर १९९० ला श्रीलंकेविरुद्ध त्याने पहिले अर्धशतक केले. त्या सामन्यात श्रीलंकेने भारताला २२८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १४६ धावांवर ३ बाद अशा स्थितीत असताना सचिन फलंदाजीसाठी आला.

त्यावेळी त्याने तत्कालिन कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या साथीने भारताचा डाव सांभाळण्यास सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. पण भारतीय संघाला २ धावांची गरज असताना सचिन ४९ चेंडूत ५२ धावा करुन बाद झाला. या खेळीत त्याने ५ चौकार मारले होते. अझरुद्दीनने नाबाद ५३ धावांची खेळी केली. सचिनला ग्रॅमी लिब्रॉयने त्रिफळाचीत केले होते.

गोलंदाजीतही सचिनची कमाल
केवळ फलंदाजीतच नाही तर सचिनने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली होती. फलंदाजीआधी गोलंदाजी करताना सचिनने त्या सामन्यान ९ षटके टाकली होती. यात त्याने ३९ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने डंमिका रणतुंगाला २५ धावांवर आणि रोशन महानामाला २४ धावांवर बाद केले होते. एवढेच नाही तर सचिनने ४४ धावा करणाऱ्या असंका गुरुसिन्हाचा आणि रुमेश रत्नानायके (१) झेलही घेतला होता.

अष्टपैलू कामगिरीसाठी मिळाला सामनावीर पुरस्कार 
सचिनने केलेल्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मिळाला होता. सचिनचा हा वनडेमधील पहिला सामनावीर पुरस्कार ठरला होता.

या सामन्यानंतर मात्र सचिनने कधी मागे वळुन पाहिले नाही. त्याने पुढे जाऊन वनडेत ४९ शतके केली.

महत्त्वाच्या बातम्या –

HBD ‘गब्बर’! चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी

गिलच्या दुखापतीविषयी बीसीसीआयने दिले महत्त्वाचे अपडेट

लक्ष्मणच्या एनसीए प्रमुखपदाविषयी जय शहांनी दाखवले नियमांकडे बोट; म्हणाले, “यासाठी त्यांना…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---