आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रम सातत्याने बनतात आणि तुटतात. काही विक्रम तुटण्यासाठी बराच कालावधी जातो. तर, काही विक्रम तसेच राहतात. त्यापैकी, न्यूझीलंडच्या नॅथन ऍस्टलने केलेला एक विक्रम अजूनही अबाधित आहे. ऍस्टलने कसोटी क्रिकेटमध्ये झळकावलेल्या सर्वात वेगवान द्विशतकाला आज(१६ मार्च) १९ वर्ष पूर्ण झाली. त्याच्या या विश्वविक्रमी खेळीचा आपण मागोवा घेऊ.
ती वादळी खेळी
सन २००२ मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड विरुद्ध ख्राईस्टचर्च कसोटीत ऍस्टलने ही विश्वविक्रमी कामगिरी केली होती. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात संघाची अवस्था तीन बाद ११९ अशी असताना ऍस्टल मैदानात उतरला. त्याने सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांना नामोहरम करत १६८ चेंडूंमध्ये २८ चौकार व ११ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने २२२ धावांची ऐतिहासिक खेळी केली. ऍस्टलने आपले द्विशतक केवळ १५३ चेंडूंमध्ये बनवले होते. ऍस्टलच्या द्विशतकाच्या सहाय्याने न्यूझीलंडने त्या डावात ५५० धावा उभारल्या.
वेगवान द्विशतकाचा विक्रम आजही कायम
ऍस्टलने २००२ मध्ये झळकावलेल्या सर्वात वेगवान कसोटीत द्विशतकाचा विक्रम आजही कायम आहे. ऍस्टलनंतर या यादीमध्ये इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याचा क्रमांक लागतो. त्याने, याच ख्राईस्टचर्चच्या मैदानावर २०१६ साली न्यूझीलंडविरुद्ध १६३ चेंडूंमध्ये द्विशतक साजरे केले होते. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी असून त्याने १६८ चेंडूत हा कारनामा केलेला.
नॅथल ऍस्टलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
नॅथन ऍस्टलनने १९९५ ते २००७ या काळात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. त्याने न्यूझीलंडसाठी ८१ कसोटी, २२३ वनडे व ४ टी२० सामने खेळले. यामध्ये त्याने अनुक्रमे ४,७०२, ७,०९० व ७४ धावा जमविल्या. २००७ क्रिकेट विश्वचषकाच्या ऐनआधी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ पंतच्या रनआउटवरून चाहत्यांमध्ये रणकंदन, होतेय जोरदार चर्चा
रोहितचा अप्रतिम झेल आणि प्रशिक्षकांची शिट्टी, पाहा खास व्हिडिओ
बटलरने चुकवला थ्रो आणि कोहलीने चोरली धाव, पाहा व्हिडिओ