David Warner Record, AUSvsPAK Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे सुरुवात झाली आहे. या सामन्यात यजमान संघाचा विस्फोटक सलामी फलंदाज डेविड वॉर्नर याने फक्त 22 धावांचा आकडा गाठताच, भीमपराक्रम केला आहे. त्याने या विक्रमात ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू स्टीव्ह वॉ यांना मागे टाकले आहे.
खरं तर, या सामन्यात पाकिस्तान (Pakistan) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी यजमान संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी डेविड वॉर्नर (David Warner) आणि उस्मान ख्वाजा मैदानात उतरले होते. यावेळी संघाला पहिला झटका वॉर्नरच्या रुपात 90 धावसंख्येवर बसला. वॉर्नर यावेळी वैयक्तिक 38 धावसंख्येवर तंबूत परतला. त्याला आगा सलमान याने बाबर आझम याच्या हातून झेलबाद केले.
असे असले, तरीही वॉर्नरच्या 38 धावांच्या खेळीमुळे त्याने ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 18515 (David Warner 18515) धावा पूर्ण केल्या. यामुळे तो ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. त्याने 18496 धावा करणाऱ्या स्टीव्ह वॉ (Steve Waugh) यांना मागे टाकले. खरं तर, वॉर्नरने कसोटीत 8689, वनडेत 6932, आणि टी20त 2894 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याच्या नावावर आहे. पाँटिंगने त्याच्या कारकीर्दीत खेळलेल्या एकूण 559 सामन्यात 45.84च्या सरासरीने 27368 धावा केल्या आहेत. सध्यातरी कोणताही खेळाडू हा विक्रम मोडण्याच्या आसपासही दिसत नाहीये.
ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
रिकी पाँटिंग- 27368
डेविड वॉर्नर- 18515*
स्टीव्ह वॉ- 18496
ऍलन बॉर्डर- 17698
मायकल क्लार्क- 17112
सामन्याचा आढावा
दुसरीकडे, सामन्याविषयी बोलायचं झालं, तर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद याने या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीला उतरलेल्या वॉर्नर आणि ख्वाजा यांनी पहिल्या 17 षटकात अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. यावेळी ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट वॉर्नरच्या रूपात 90 धावांवर गमावली. वॉर्नर यावेळी 38 धावांवर बाद झाला, पण तो जेव्हा 2 धावांवर खेळत होता, तेव्हा अब्दुल्ला शफीक याने त्याचा सोपा झेल सोडला होता.
हेही वाचा-
Boxing Day Test म्हणजे काय आणि कसा राहिलाय भारताचा रेकॉर्ड? A to Z सर्व माहिती एकाच क्लिकवर
वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या उस्मान ख्वाजाला कर्णधार पॅट कमिन्सचा पाठिंबा, म्हणाला, ‘आयसीसी जे नियम बनवते ते…’