जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी२० लीग इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) दुसरा टप्पा युएईत पार पडला. यातील अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) झाला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने- सामने होते. हा सामना सीएसकेने २७ धावांनी आपल्या खिशात घातला. यासह सीएसकेने आयपीएलची चौथी ट्रॉफीही आपल्या नावावर केली. विशेष म्हणजे सीएसकेचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने अफलातून फलंदाजी करत सर्वांची मने जिंकली. तो आयपीएल २०२१मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
ऋतुराजने आयपीएल २०२१ मध्ये ६०० पेक्षाही अधिक धावा केल्या. यासह त्याने ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणकोणत्या खेळाडूला ऑरेंज कॅप मिळाली आहे? या लेखातून आपण त्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया… (Orange Cap Holders In IPL)
#आतापर्यंत आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारे फलंदाज –
१. आयपीएल २००८- शॉन मार्श
पंजाब किंग्स संघाचा धडाकेबाज फलंदाज शॉन मार्शने आयपीएल २००८ मध्ये धावांचा पाऊस पाडला होता. त्याने या हंगामात ११ सामने खेळताना ६८.४४ च्या सरासरीने ६१६ धावा कुटल्या होत्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके ठोकली होती. यासह तो आयपीएलच्या पहिल्याच हंगामात ऑरेंज कॅप पटकावणारा पहिला खेळाडू ठरला होता.
२. आयपीएल २००९- मॅथ्यू हेडन
चेन्नई सुपर किंग्स संघाचे विस्फोटक फलंदाज मॅथ्यू हेडन यांनी आयपीएल २००९ मध्ये आपल्या फलंदाजीने धुमाकूळ केला होता. त्यांनी या हंगामात १२ सामने खेळताना ५२ च्या सरासरीने ५७२ धावा केल्या होत्या. यामध्ये त्यांनी ५ अर्धशतक ठोकले होते. यासोबतच त्यांनी आयपीएल २००९ मधील ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती.
३. आयपीएल २०१०- सचिन तेंडुलकर
मुंबई इंडियन्स संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच आयपीएलमध्येही आपल्या फलंदाजीचा डंका वाजवला आहे. याचा प्रत्यय आयपीएल २०१० मध्ये आला. सचिनने या हंगामात १५ सामने खेळताना ४७.५३ च्या सरासरीने ६१८ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्याच्या ५ अर्धशतकांचा समावेश होता. या धावांच्या मदतीने सचिनने ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती.
४. आयपीएल २०११- ख्रिस गेल
आयपीएल २०११ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना ख्रिस गेलने आपल्या फलंदाजीतून आग ओकली होती. त्याने अवघ्या १२ सामने खेळताना ६७.५५ च्या सरासरीने ६०८ धावा केल्या होत्या. या हंगामात गेलने एक नव्हे, तर तब्बल २ शतके ठोकली होती. यासोबतच त्याने ३ अर्धशतकेही आपल्या नावावर केली होती. या कामगिरीच्या जोरावर गेलने ऑरेंज कॅपही आपल्या नावावर केली होती.
५. आयपीएल २०१२- ख्रिस गेल
विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने आयपीएल २०१२ मध्येही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना धुमाकूळ घातला होता. त्याने १५ सामने खेळताना ६१.०८ च्या सरासरीने ७३३ धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने १ शतक आणि ७ अर्धशतके ठोकली होती. या कामगिरीमुळे त्याने सलग दुसऱ्या वर्षीही ऑरेंज कॅप पटकावण्याचा मान पटकावला होता.
६. आयपीएल २०१३- मायकल हसी
चेन्नई सुपर किंग्स संघाचा धडाकेबाज फलंदाज मायकल हसीने आयपीएल २०१३ चा हंगाम आपल्या फलंदाजीने गाजवला होता. त्याने १७ सामने खेळताना ५२.३५ च्या सरासरीने ७३३ धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने ६ अर्धशतके केली होती. यासह तो ऑरेंज कॅपही आपल्या नावावर करण्यास यशस्वी झाला होता.
७. आयपीएल २०१४- रॉबिन उथप्पा
आयपीएल २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना रॉबिन उथप्पाने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच चकित केले होते. त्याने १६ सामने खेळताना ४४ च्या सरासरीने ६६० धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या ५ अर्धशतकांचाही समावेश होता. या कामगिरीमुळे तो ऑरेंज कॅप आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरला होता.
८. आयपीएल २०१५- डेविड वॉर्नर
सनरायझर्स हैदराबाद संघाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नरने आयपीएल २०१५ मध्ये आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडला होता. यामध्ये त्याने सर्वांना आपल्या फलंदाजीची दखल घेण्यास भाग पाडले होते. यामध्ये त्याने १४ सामने खेळताना ४३.२३ च्या सरासरीने ५६२ धावा केल्या होत्या. यामध्ये तब्बल ७ अर्धशतकांचाही समावेश होता. यासह त्याने ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरले होते.
९. आयपीएल २०१६- विराट कोहली
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने आयपीएल २०१६ चा हंगामात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या हंगामात त्याने केलेली आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या होती. त्याने १६ सामने खेळताना ८१.०८ च्या सरासरीने तब्बल ९७३ धावा केल्या होत्या. यामध्ये विराटने एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल ४ शतके आणि ७ अर्धशतके ठोकली होती. त्याच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे त्याने ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती.
१०. आयपीएल २०१७- डेविड वॉर्नर
सनरायझर्स हैदराबाद संघाचा फलंदाज डेविड वॉर्नरने आयपीएल २०१७ मध्येही आपल्या बॅटीतून धावांचा पाऊस पाडला होता. त्याने १४ सामने खेळताना ५८.२७ च्या सरासरीने सर्वाधिक ६४१ धावा कुटल्या होत्या. यामध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश होता. त्याच्या या कामगिरीमुळेच तो ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरण्यात यशस्वी झाला होता.
११. आयपीएल २०१८- केन विलियम्सन
आयपीएल २०१८ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाच्याच खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या होत्या. तो खेळाडू म्हणजेच केन विलियम्सन होय. त्याने या हंगामात १७ सामने खेळताना ५२.५० च्या सरासरीने तब्बल ७३५ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये ८ अर्धशतकांचा समावेश होता. आपल्या अप्रतिम कामगिरीमुळे तो या हंगामात ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.
१२. आयपीएल २०१९- डेविड वॉर्नर
आयपीएल २०१७, २०१८ आणि २०१९ या तिन्ही हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी सर्वाधिक धावा कुटल्या होत्या. आयपीएल २०१९ मध्ये डेविड वॉर्नरने १२ सामने खेळताना ६९.२० च्या सरासरीने ६९२ धावा केल्या होत्या. यामध्ये १ शतक आणि ८ अर्धशतके ठोकली होती. यामुळे तो ऑरेंज कॅप आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरला होता.
१३. आयपीएल २०२०- केएल राहुल
पंजाब किंग्स संघाचा कर्णधार केएल राहुलने आयपीएल २०२०मध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले होते. त्याने या हंगामात सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने १४ सामने खेळताना ५५.८३ च्या सरासरीने ६७० धावा ठोकल्या होत्या. या धावा करताना त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके ठोकली होती. यामुळे तो सहजरीत्या आयपीएल २०२० च्या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.
१४. आयपीएल २०२१- ऋतुराज गायकवाड
चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. त्याने १६ सामने खेळताना ४३.३५ च्या सरासरीने ६३५ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने १ शतक आणि ४ अर्धशतकेही ठोकली.
हेही वाचा-
-भारीच ना! आयपीएल २०२१ला मिळाला नवा ‘पर्पल कॅप’ विजेता; ‘हे’ आहेत सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ गोलंदाज
-लय भारी! यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ ५ फलंदाजांचाच बोलबाला; केल्यात सर्वाधिक धावा
-आमचा नाद करायचा न्हाय! आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणारे गोलंदाज; ‘या’ भारतीयाने पटकावल्यात दोनदा