पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर सध्या भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना शुक्रवार रोजी (२६ मार्च) झाला. पाहुण्या इंग्लंडने ६ गड्यांनी हा सामना जिंकत मागील पराभवाचा वचपा काढला. याबरोबरच मालिकेत १-१ ने बरोबरीही साधली. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक काढले. ६६ धावांवर बाद झाल्यामुळे त्याच्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. मात्र, स्वतः या विराटने या शतकाविषयी बोलताना मोठे भाष्य केले.
शतकाविषयी विराट म्हणाला..
मालिकेतील सलग दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. मात्र, तो ६६ धावांवर आदिल रशीदच्या गोलंदाजीवर बाद झाला. जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेला विराट २०१९ पासून खेळलेल्या ४३ डावांमध्ये शतक करू शकला नाही.
याविषयी बोलताना त्याने म्हटले, “मी आयुष्यात कधीही शतकासाठी खेळलो नाही. त्यामुळेच कदाचित इतक्या कमी वेळात माझ्याकडून इतकी शतके ठोकली गेली आहेत. माझ्यासाठी नेहमी संघाचा विजय महत्त्वपूर्ण राहिला आहे. माझे वैयक्तिक शतक नाही.”
विराटने दुसऱ्या सामन्यातील पराभव खुल्या दिलाने मान्य केला. त्याने इंग्लंडचे फलंदाज जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स यांच्या खेळ्यांचे कौतुक केले. सोबतच, विराटने शतक झळकावणारा केएल राहुल व आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या रिषभ पंतची देखील कौतुक केले. त्यांच्यामुळे भारतीय संघ ३०० धावांच्या पुढे मजल मारू शकला, असे त्याने म्हटले.
इंग्लंडची मालिकेत बरोबरी
नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण निवडले आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. केएल राहुलचे झुंजार शतक आणि विराट कोहली, रिषभ पंतच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३३६ धावांचा डोंगर उभा केला.
प्रत्युत्तरादाखल, जॉनी बेयरस्टो (१२४ धावा) आणि बेन स्टोक्सने (९९ धावा) भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्यांच्या तूफानी खेळ्यांच्या जोरावर इंग्लंडने चार गडी गमावत ४३.३ षटकातच विजयी लक्ष्य पूर्ण केले. मालिकेतील अखेरचा निर्णायक सामना रविवारी खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच्या गोलंदाजांना ट्रोल करायला गेलेला सेहवागच पडला तोंडघशी, करावं लागलं ‘ते’ ट्विट डिलीट
सचिन तेंडुलकरआधी ‘या’ क्रिकेटपटूंना झाला होता कोरोना, पाहा यादी






