क्रिकेट विश्वात आतापर्यंत असे अनेक दिग्गज गोलंदाज होऊन गेले आणि आहेत, ज्यांनी आपल्या घातक वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना घाम फोडला. सध्याच्या दिग्गज गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह याचाही समावेश होतो. बुमराह हा पाठीच्या दुखापतीमुळे टी20 विश्वचषकात सहभागी होऊ शकला नाही. आता त्याच्यावर जगातील दिग्गज वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जेफ थॉमसन यांनी बुमराहबद्दल मोठे वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, बुमराहला जर त्याची कारकीर्द दीर्घकाळ टिकवायची असेल, तर तो दीर्घकाळ तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळण्याची जोखीम उचलू शकत नाही.
सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेले 72 वर्षीय जेफ थॉमसन (Jeff Thomson) म्हणतात की, हे सर्व जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला ठरवायचे आहे की, त्याला तिन्ही क्रिकेट प्रकारांपैकी कशात खेळायचे आहे. थॉमसन यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “बुमराह त्याच्या शरीरावर खूपच दबाव टाकतो. कारण, तो सर्व क्रिकेट प्रकारात खेळतो आणि अशात तो दुखापतग्रस्त होतो. आता निर्णय त्याला घ्यायचाय की, त्याला काय करायचं आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “प्रेक्षकांना वाटते की, त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळावे. चाहते मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला गोलंदाजी करताना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये येतात. वनडेत फक्त 60 आणि टी20 क्रिकेटमध्ये 24 चेंडू टाकायचे असतात. आता हे त्याच्यावर अवलंबून आहे की, त्याला कोणत्या क्रिकेट प्रकारात खेळायचे आहे.”
“कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात 15 षटके टाकण्याची गरज पडेल. तुम्ही हे चांगल्याप्रकारे समजू शकता की, तुमची कारकीर्द दीर्घकाळ टिकवायची असेल, तर तुम्ही कोणत्या क्रिकेट प्रकारात खेळले पाहिजे. ज्याप्रकारे प्रत्येक वर्षी विश्वचषक होत आहे, त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकाराचे महत्तही कमी होत नाहीये,” असेही पुढे बोलताना ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, हे बुमराहला ठरवायचे आहे की, त्याच्यासाठी कोणता क्रिकेट प्रकार योग्य आहे. कारण, कोणताही गोलंदाज फक्त 10 वर्षेच कारकीर्दीच्या शिखरावर असतो.
“खेळाडूच्या कारकीर्दीत तुम्ही फक्त एक दशक यशाच्या शिखरावर राहून गोलंदाजी करू शकता. त्यामुळे भावना बाजूला ठेवून हे समजून घेणे गरजेचे आहे की, तुमच्यासाठी योग्य काय आहे. असे काय आहे, ज्याने तुमची कारकीर्द चांगल्याप्रकारे पुढे जाईल आणि असे काय आहे, ज्याने तुम्ही दीर्घकाळ आपल्या देशाची सेवा करू शकाल,” असेही ते म्हणाले.
थॉमसन म्हणाले की, “हे यावर अवलंबून आहे की, प्रेक्षकांना काय पाहिजे. जर लोकांची इच्छा आहे की, बुमराह भारतासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी करून भारताला विश्वचषक जिंकून देऊ शकतो, तर त्याने इतर क्रिकेट प्रकारासाठी मर्यादित षटकांचा क्रिकेट प्रकार का सोडावा. हा निर्णय त्याला करावा लागेल की, तो कशाप्रकारे भारताची दीर्घकाळ सेवा करू शकतो. हा निर्णय भावनिक होऊन नाही, तर वस्तुस्थितीवर आधारित असला पाहिजे.”
जसप्रीत बुमराहची टी20 कारकीर्द
जसप्रीत बुमराह याच्या टी20 कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारताकडून आतापर्यंत 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 59 डावात गोलंदाजी करताना 6.62च्या इकॉनॉमी रेटने 70 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 11 धावा देत 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाविषयी डेल स्टेनची भविष्यवाणी! वाचा काय म्हणाला दिग्गज
न्यूझीलंडचा विश्वचषकातील दुसरा विजय, श्रीलंकेला हरवताच विलियम्सन झाला भलताच खुश






