दुखापतींनी भारतीय संघाच्या खेळाडूंचा पाठलाग अद्याप सोडला नाहीये. अनेक स्टार खेळाडू दुखापतीने ग्रस्त आहेत. कुणाला पायाची, तर कुणाला पाठीची दुखापत सतावतेय. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचाही समावेश आहे. बुमराहला पाठीची दुखापत झाली असून ती बरी होण्याचं नाव घेत नाहीये. मागील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या या दुखापतीमुळे त्याला आशिया चषक आणि टी20 विश्वचषक 2022 यांसारख्या अनेक मोठ्या स्पर्धांमधून बाहेर पडावे लागले होते. अशात वृत्त येत आहे की, आगामी विश्वचषक 2023 स्पर्धा लक्षात घेता बुमराहने त्याच्या पाठीची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सर्जरीसाठी न्यूझीलंड देशात जाऊ शकतो. बुमराहची सर्जरी झाली, तर त्याला क्रिकेटच्या मैदानातून कमीत कमी 20 ते 24 आठवडे दूर राहावे लागेल. याचा अर्थ, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धा आणि भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना (World Test Championship Tournament Final) खेळण्याचे तिकीट मिळवले, तर त्यासाठी तो मुकण्याची शक्यता आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, “जसप्रीत बुमराह त्याच्या वेदनादायी पाठीच्या सर्जरीसाठी न्यूझीलंडला जाऊ शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या व्यवस्थापकांनी न्यूझीलंडच्या एका सर्जनची यासाठी निवड केली आहे. याच सर्जनने जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याच्या दुखापतीवरही काम केले होते. अशात बुमराहला ऑकलंडला पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे.”
जसप्रीत बुमराह इंग्लंडमध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत पुनरागमन केले होते. मात्र, पूर्णत: फिट नसल्यामुळे त्याला पुढे मोठ्या स्पर्धेचा भाग होता आले नव्हते. या वर्षाच्या सुरुवातीला त्याला श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेसाठी निवडले होते. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच त्याचे नाव अंतिम अकरा खेळाडूंच्या संघातून वगळण्यात आले.
बीसीसीआय आगामी विश्वचषक 2023 स्पर्धा लक्षात घेता आता जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. त्यामुळेच त्याच्या या सर्जरीसाठी वेगाने पावले उचलली जात आहेत. बुमराहची ही सर्जरी झाली, तर तो सप्टेंबरमध्ये पुनरागमन करू शकतो. जेणेकरून त्याला विश्वचषकाच्या तयारीसाठी वेळ मिळू शकेल. (pacer jasprit bumrah wait for comeback is increased may fly to new zealand for back surgery)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय गोलंदाजांनी पुन्हा दाखवली कमाल, 200 धावांच्या आत ऑस्ट्रेलिया सर्वबाद
ब्रेकिंग! विश्वचषकात विक्रमी खेळी करणारा दिग्गज फुटबॉलपटू काळाच्या पडद्याआड, क्रीडाविश्वावर शोककळा