---Advertisement---

आशिया चषकापूर्वी आफ्रिदीने इंग्लंडमध्ये दाखवला इंगा, पहिल्याच ओव्हरमध्ये घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स, Video

Shaheen-Afridi
---Advertisement---

इंग्लंडमध्ये सध्या टी20 वायटॅलिटी ब्लास्ट म्हणजेच टी20 ब्लास्ट स्पर्धा सुरू आहे. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी या स्पर्धेत गोलंदाजीतून आग ओकताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. 30 जून) नॉटिंघमशायर संघाकडून खेळताना त्याने असा काही कारनामा केला, जो त्याच्यापूर्वी जगातील कुठल्याच गोलंदाजाने केला नव्हता. त्यामुळे त्याने इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव नोंदवले. या सामन्यात त्याचा संघ पराभूत झाला, पण त्याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने सामनावीर पुरस्कार आपल्या नावावर केला. कदाचित आशिया चषकापूर्वी शाहीनच्या या प्रदर्शनामुळे पाकिस्तान संघही खुश झाला असेल.

ट्रेंट ब्रिजच्या स्टेडिअमवर नॉटिंघमशायर विरुद्ध वॉर्विकशायर संघात सामना पार पडला. या सामन्यात वॉर्विकशायर संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी नॉटिंघमशायर संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सर्व विकेट्स गमावत 168 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्विकशायर संघाने 19.1 षटकातच 8 विकेट्स गमावत 172 धावा केल्या. तसेच, सामना 2 विकेट्सने खिशात घातला. असे असले, तरीही शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) भलताच चमकला.

शाहीन आफ्रिदीचा विक्रम
सामन्याच्या पहिल्याच षटकात शाहीन आफ्रिदी 4 विकेट्स (Shaheen Afridi take 4 wickets) घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनला. शाहीनने वॉर्विकशायर संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स डेविस याला डावाच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद केले. डेविस यष्टीच्या समोरच उभा राहिला, ज्याला शाहीनच्या गोलंदाजीवर तोड सापडला नाही. त्यामुळे तो पायचीत बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर शाहीनने ख्रिस बेंजामिन याला बाद केले. डेविसप्रमाणेच बेंजामिनही शून्यावर बाद झाला. गोलंदाजाने त्याला त्रिफळाचीत बाद केले.

शाहीन यावेळी हॅट्रिक घेण्यास मुकला, पण त्याने पहिल्या षटकात आणखी दोन विकेट्स घेत इतिहास रचला. त्याने पाचव्या चेंडूवर डॅन मूसली याला झेलबाद केले. तसेच, अखेरच्या चेंडूवर एड बर्नार्ड याला शून्यावर त्रिफळाचीत बाद केले. अशाप्रकारे शाहीन आफ्रिदीने 6 चेंडूत एकूण 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

पहिल्या षटकात चार विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज
शाहीन आफ्रिदीने या प्रदर्शनामुळे क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव नोंदवले. कारण, टी20 सामन्यांच्या दोन दशकाहून अधिक काळाच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाने सामन्याच्या पहिल्याच षटकात चार विकेट्स घेण्याची, ही पहिलीच वेळ होती. त्याने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 29 धावा खर्चून 4 विकेट्स घेतल्या. मात्र, शाहीनचा प्रयत्न व्यर्थ ठरला. कारण, तो सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. यजमान संघाला 169 धावांचा बचाव करण्यात अपयश आले. सलामीवीर रॉबर्ट्स येट्स याच्या 46 चेंडूत 65 धावांच्या जोरावर वॉर्विकशायर संघाने 19.1 षटकात 8 विकेट्स गमावत आव्हान पूर्ण केले.

शाहीन आफ्रिदीविषयी बोलायचं झालं, तर तो जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाकडून खेळताना दिसेल. (pacer Shaheen Afridi becomes 1st bowler take 4 wickets in first over in t20 before asia cup 2023)

महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! दिग्गज गोलंदाजाने केला भारताच्या मुख्य निवडकर्ता पदासाठी अर्ज, बीसीसीआयकडून पगारातही वाढ
महिला सीपीएल खेळणारी पहिली भारतीय खेळाडू; टीम इंडियाकडून खेळण्याआधी श्रेयांका पाटीलला संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---