Loading...

अखेर त्या फलंदाजाने तब्बल १३ वर्षांनंतर केले दुसरे शतक

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या शेफिल्ड शिल्ड 2019 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत तास्मानिया विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघात 10 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या सामन्यात तास्मानियाकडून पहिल्या डावात टीम पेनने शतकी खेळी केली आहे. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील केवळ दुसरे शतक आहे.

विशेष म्हणजे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जवळजवळ 13 वर्षांनी शतक केले आहे. त्याने पहिले शतक पर्थवर 2006 मध्ये केले होते. त्याने त्यावेळी वयाच्या 21व्या वर्षी 215 धावांची खेळी केली होती.

त्यानंतर आता 4738 दिवसांनंतर त्याने पर्थमध्येच शतक केले आहे. त्याने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 209 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकारासह 121 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे तास्मानियाने पहिल्या डावात 60 धावांची आघाडी घेतली आहे.

तास्मानियाने पहिल्या डावात सर्वबाद 397 धावा केल्या. त्यांच्याकडून पेन व्यतिरिक्त सेलेब जेवेलने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच कर्णधार मॅथ्यू वेडने 40 आणि सलामीवीर फलंदाज जॉर्डन सिल्कने 44 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 337 धावा केल्या होत्या. सध्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने आज(12 ऑक्टोबर) तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 2 बाद 148 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्यांनी 60 धावांची पिछाडी भरुन काढत 88 धावांची आघाडी घेतली आहे.

तसेच दुसऱ्या डावात वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाचे शॉन आणि मिशेल हे मार्श बंधू नाबाद आहेत. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 112 धावांची भागीदारी केली आहे. शॉन 74 आणि मिशेल 51 धावांवर नाबाद आहे.

Loading...

You might also like
Loading...