रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात आतापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने चमकदार कामगिरी केली आहे. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी यजमान गोलंदाजांची कडवी परीक्षा घेतली. आक्रमक खेळ करत दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली. पाकिस्तानने पहिला डाव ४ गडी बाद ४७६ धावांवर घोषित केला होता. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने २ गडी गमावून २७१ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघ सध्या २०५ धावांनी पिछाडीवर आहे.
दिवसाचा खेळ संपेपर्यंत मार्नस लॅब्युशेनने आक्रमक अर्धशतक झळकावले होते. ६९ धावा करून तो खेळपट्टीवर आहे. मात्र, खराब प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. दिवसाचा खेळ २१ षटके शिल्लक असताना थांबविण्यात आला. दुसऱ्या बाजूला स्टीव्ह स्मिथने लॅब्युशेनसह २४ धावा करून नाबाद आहे.
उस्मान ख्वाजाच्या बॅटमधून अनेक चांगले फटके दिसले. या सामन्यात त्याचे शतक ३ धावांनी हुकले. ख्वाजा ९७ धावा करून बाद झाला. एकूणच वॉर्नर आणि ख्वाजा यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला सामन्यात पलटवार करता आला.
ख्वाजाचे शानदार पुनरागमन
इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेदरम्यान उस्मान ख्वाजाचे तब्बल तीन वर्षांनी ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले. ऍशेसच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. यानंतर सिडनी येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. या संधीचा फायदा घेत त्याने सामन्याच्या पहिल्या डावात नाबाद १३७ आणि दुसऱ्या डावात १०१ धावा केल्या. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. उस्मान ख्वाजाच्या शेवटच्या पाच कसोटी डावांवर नजर टाकली तर त्याने १३७, १०१, ६, ११ आणि ९७ धावा केल्या आहेत.
अनिर्णित राहू शकतो सामना
रावळपिंडी कसोटीत ऑस्ट्रेलिया ज्याप्रकारे झुंज देत आहे, ते पाहता हा सामना अनिर्णित राहण्याची अपेक्षा आहे. ही खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजांचे नंदनवन ठरले आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसानंतरही दोन डाव अजून पूर्ण झालेले नाहीत. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ उपाहारापर्यंत फलंदाजी करण्यात यशस्वी ठरला, तर सामना अनिर्णित राहण्याची शक्यता जास्त आहे.
महत्वाच्या बातम्या-
शेन वॉर्नच्या आठवणीत ढसाढसा रडला रिकी पाँटिंग; व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील (mahasports.in)