---Advertisement---

कोरोना संक्रमित राउफच्या जागी ‘या’ हॅट्रिकवीराची पाकिस्तानच्या कसोटी संघात वर्णी, करणार पुनरागमन

On: बुधवार, मार्च 2, 2022 3:09 PM
Pakistan
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर (Australia On Pakistan Tour) असून उभय संघांमध्ये ४ मार्चपासून ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानच्या संघासाठी त्यांच्या गोलंदाजांची फिटनेस चिंतेचे कारण बनली आहे. गोलंदाज हसन अली आणि फहिम अश्रफ हे दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत. यानंतर मंगळवारी (१ मार्च) पाकिस्तानचा अजून एक वेगवान गोलंदाज हॅरिस राउफ (Haris Rauf) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. अशात पाकिस्तान बोर्डाने राउफच्या जागी १९ वर्षीय वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) याला संघात सहभागी केले आहे.

नसीम शाह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी राखीव खेळाडू म्हणून पाकिस्तानच्या संघाचा भाग होता. परंतु पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच वेगवान गोलंदाज राउफ कोरोना संक्रमित आढळल्यामुळे आता नसीम शाहला मुख्य संघात सहभागी करण्यात आले आहे. तो सध्या फक्त रावळपिंडी येथे ४ ते ८ मार्च दरम्यान होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानच्या संघाचा भाग असेल.

कमी वयातच आपल्या वेगाने फलंदाजांचा घाम काढणाऱ्या नसीम शाहने २०१९ मध्येच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच पहिला कसोटी सामना खेळला होता. मात्र ब्रिस्बेन येथे झालेल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात तो केवळ एकाच डावात खेळू शकला होता. त्या डावात त्याने १ विकेट घेतली होती. असे असले तरीही, पुढे त्याने संधी मिळाल्यानंतर चांगली कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे.

त्याच्या खात्यात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात हॅट्रिक घेण्याची असाधारण कामगिरी नोंदली गेलेली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये कारकिर्दीतील केवळ चौथ्या कसोटी सामन्यात त्याने हा कारनामा केला होता. हा सामना बांगलादेशविरुद्ध झाला होता. या सामन्यावेळी तो केवळ १७ वर्षांचा होता आणि त्याने या वयात सलग ३ चेंडूंवर बांगलादेशच्या ३ फलंदाजांना बाद करत इतिहास रचला होता.

नसीम शाहच्या एकूण कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत त्याने ९ कसोटी सामने खेळताना २० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), अब्दुल्ला शफीक, अझहर अली, फवाद आलम, इफ्तिखार अहमद, इमाम-उल-हक, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, नौमान अली, साजिद खान, साउद शकील, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, जाहिद महमूद

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय दिग्गजाने टी२० विश्वचषकासाठी केली संभाव्य संघाची भविष्यवाणी; ‘या’ प्रमुख खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

पूरन थांबायचे नाव घेईना! टी१० सामन्यातच ठोकले वादळी शतक; पाहा व्हिडिओ

आवेश खानबद्दल भारतीय दिग्गजाचा कर्णधार रोहितला सल्ला; “त्याने विराटप्रमाणे…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---