न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने पाकिस्तान आणि बांगलादेश संघासोबत टी20 प्रकारातील तिरंगी मालिकेचे आयोजन केले. हे सर्व सामने ख्राईस्टचर्च येथे खेळले गेले. यातील अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (NZvPAK)यांच्यात शुक्रवारी (14 ऑक्टोबर) खेळला गेला. हा सामना पाकिस्तानने 5 विकेट्सने जिंकला आहे. या सामन्यात मोहम्मद नवाज आणि इफ्तिखार अहमद हे विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. या मालिकेत बांगलादेश आधीच चारही सामन्यात पराभूत होऊन मालिकेबाहेर झाला.
मालिका निर्णयाच्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी उत्तम सुरूवात केली. त्यांनी यजमान संघाच्या दोन्ही सलामीवीरांना लवकरच तंबूचा रस्ता दाखवला. फिन ऍलन (12) आणि डेवॉन कॉनवे (14) यांनी आपल्या विकेट गमावल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने अर्धशतकी खेळी करत संघाचा धावफलक हलता ठेवला.
विलियमसनने 38 चेंडूत 59 धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने 29 आणि मार्क चॅपमन याने 25 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 163 धावसंख्या उभारली. हे लक्ष्य पाकिस्तानने 3 चेंडू शिल्लक राखत जिंकले. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी संथ गतीने पाकिस्तानच्या डावाची सुरूवात केली, मात्र ते धावा काढण्यात अपयशी ठरल्याने नवाजने सामना सांभाळला.
बाबर 15 धावा करत तंबूत परतला. पाकिस्तानने 10 षटकात 64 धावा केल्या. त्यानंतर शान मसूद (19) आणि रिझवान (34) हे पण बाद झाल्याने पाकिस्तान सामना गमावणार की काय असे वाटत असताना नवाजने विलक्षण खेळी केली. त्याने 22 चेंडूत नाबाद 38 धावा आणि हैदर अली याने 15 चेंडूत 31 धावा केल्या. इफ्तिखारने 20व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर उत्तुग षटकार खेचला आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याने 14 चेंडूत 25 धावा केल्या.
https://twitter.com/TheRealPCB/status/1580791596446253061?s=20&t=fmCzPhWF5MHJQgQceFnVDw
गोलंदाजीमध्ये न्यूझीलंडच्या मायकल ब्रसवेल यानेच उत्तम कामगिरी केली आहे. त्याने 4 षटकात 14 धावा देत बाबर आणि मसूद या दोन विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केन विलियमसनची 333 दिवसानंतर इंटरनॅशनल फिफ्टी, फायनलनंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात मोठी खेळी
भविष्यात भारत-पाकिस्तान क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने येतील का? घ्या जाणून






